‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाचे प्रदर्शन सुरळीत व्हावे यासाठी ‘प्रायश्चित’ म्हणून दिग्दर्शक करण जोहर याच्याकडून देण्यात येणारी पाच कोटींची मदत ही सैन्य कल्याण निधीला गेल्या दोन महिन्यांमध्ये मिळालेल्या एकुण रक्कमेच्या तिप्पट असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, युद्धातील शहीदांच्या नातेवाईकांसाठी ऑगस्ट महिन्यात हा निधी सुरू करण्यात आला. तेव्हापासून आतापर्यंतच्या दोन महिन्यांच्या काळात या निधीसाठी १.४ कोटी रूपयांची देणगी देण्यात आली आहे. ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वादासंदर्भात तोडगा काढण्यासाठी नुकत्याच झालेल्या एका बैठकीत चित्रपटात पाकिस्तानी कलाकार असलेल्या निर्मात्यांनी प्रायश्चित म्हणून सैन्य कल्याण निधीला पाच कोटी रूपये देण्याची अट घालण्यात आली होती. निर्मात्यांच्या संघटनेने ही अट मान्यही केली होती.

युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना मदत करावी, अशी देशातील अनेक नागरिकांची आणि संस्थांची इच्छा होती. सियाचीन येथील हिमस्खलनाच्या घटनेत १० भारतीय जवानांचा मृत्यू झाल्यानंतर संरक्षण मंत्रालयाकडे मोठ्याप्रमाणावर अशाप्रकारचे विनंतीअर्ज आले होते. ही मागणी विचारात घेऊन केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडून सैन्य कल्याण निधीचा उपक्रम सुरू करण्यात आला होता. हा केंद्रीय निधी असून त्यासाठी सामान्य नागरिक आणि संस्थांकडून निधी स्विकारला जातो. या निधीसंदर्भातील व्यवहार लष्कराकडूनच बघितले जातात. देशाचे रक्षण करताना शहीद झालेल्या जवानांच्या नातेवाईकांना या निधीतून मदत दिली जाते. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी गेल्याच महिन्यात यासंबंधीच्या प्रक्रियेला मंजुरी दिली होती. या निधीसंदर्भात संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात शहीदांच्या नातेवाईकांना करण्यात येणार मदत स्वेच्छेने केली जावी, असे म्हटले होते. तसेच या निधीसाठी देण्यात येणाऱ्या आर्थिक देणग्यांना करसवलत ही देण्यात आली होती.
लष्कराला खंडणीचा पैसा नको!
पाकिस्तानी कलाकारांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला मनसेने प्रखर विरोध दर्शवला होता. या पाश्र्वभूमीवर शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राज ठाकरे आणि करण जोहर यांच्यात बैठक झाली. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर मनसेने चित्रपटाला असलेला विरोध मागे घेतल्याचे जाहीर केले. मात्र, सैनिक कल्याण निधीला पाच कोटींचा निधी आणि चित्रपटाच्या सुरुवातीला उरी आणि पठाणकोट हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहात असल्याचा फलक दाखवण्याची सक्ती या दोन अटी मनसे अध्यक्षांनी चित्रपटाच्या निर्मात्यांवर लादल्या होत्या. मात्र, सैनिक कल्याण निधीला खंडणीचा पैसा नको, अशी टीका करत अनेकांनी अशाप्रकारच्या मदतीला आक्षेप घेतला होता. मात्र, भारतीय सैन्याने या वादात पडण्याचे टाळले होते.
आता ‘मनसे’ आमची देशभक्ती ठरवणार का?- शबाना आझमी