“सन १९९९मध्ये कारगिल येथे भारत-पाकिस्तान युद्धात झालेला विजय हा भारतीय लष्करासाठी मोठा अभिमानाचा क्षण होता. मात्र, त्याकाळात निर्माण झालेली परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही”, अशी खात्री लष्कराच्या उत्तर विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल डी. अंबू यांनी देशवासीयांना दिली आहे. कारगिल विजयाच्या १८व्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय लष्कराकडून द्रास येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी कारगिल युद्धावेळीच्या आठवणींना उजाळाही दिला.

जम्मू आणि काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीवर बोलताना लेफ्ट. जन. अंबू म्हणाले, “सीमावर्ती भागात टेहळणी करणारी यंत्रणा आता वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी वर्षभरासाठी आता लष्करी तुकड्या तैनात करण्यात येतात. त्यामुळे आता कारगिलचा भाग हा पहिल्यापेक्षा जास्त सुरक्षित झाला आहे”.

घुसखोरी आणि दहशतवादाबाबत बोलताना लेफ्ट. जन. अंबू म्हणाले, ” घुसखोरीच्या प्रकारांमध्ये आलिकडेच वाढ झाली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आपला आता चांगला अंमल आहे. आपण सध्या खूपच मजबूत स्थितीत असून गेल्या तीन महिन्यांत आपण सुमारे ३६ घुसखोरांना कंठस्नान घातले आहे. घुसखोर हे मागे हटायला मागत नाहीत मात्र, ते आपल्या जमीनीवर पाय ठेवणार नाहीत एवढी खात्री मी तुम्हाला देऊ शकतो. दहशतवाद्यांच्या विरोधातील मोहिमेसाठी भारतीय लष्कराला जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफची मोलाची मदत होत असल्याने आमचा उत्साह देखील वाढवत असल्याचे अंबू यांनी सांगितले.

चीनच्या सीमावर्ती भागाबाबत ते म्हणाले, पूर्व लडाख आणि चीन सीमेजवळ सध्या कुठल्याही ताण तणावाची स्थिती नाही. चीन आणि भारताचा सीमाभाग हा वादग्रस्त भाग असून याठीकाणी कुठलीही सीमीरेषा निश्चित केलेली नाही. त्यामुळे याबाबत आपण स्वत: सीमाभाग ठरवून घेतलेला आहे. तरीही, देशांमधील प्रोटोकॉल आणि इतर गोष्टींमुळे सध्या पूर्व लडाखमधील परिस्थिती ही शांत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

लेफ्ट. जन. अंबू म्हणाले, १९९९ मध्ये अनेक घुसखोर हे पाकिस्तानातून भारतीय हद्दीत घुसले होते. यावेळी भारतीय लष्काराने त्यांच्यावर धडक कारवाई करीत मोठा पराक्रम गाजवून त्यांना पिटाळून लावले होते. त्यामुळेच प्रत्येक वर्षी या पराक्रमाची, शहीदांची आणि विजयाची आठवण म्हणून २० ते २६ जुलै दरम्यान कारगिल दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.