अमेरिकेच्या कोलंबिया अंतराळयान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कल्पना चावला हिच्या कर्नाल या मूळ गावातील एका शाळेत शिकणाऱ्या एका किशोरवयीन मुलीची निवड नासाच्या पंधरा दिवसांच्या उन्हाळी शिबिरासाठी झाली आहे.
इंटरनॅशनल समर स्पेस स्कूल फाउंडेशनच्या वतीने हे उन्हाळी शिबिर घेण्यात येत आहे. समद्रिता मंडल या बारावीतील विद्यार्थिनीची नासाच्या शिबिरासाठी निवड करण्यात आली असून ती टागोर बाल निकेतन वरिष्ठ माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी आहे. ती दिल्लीहून शनिवारी रवाना झाली. नासा विद्यार्थ्यांना दोन वर्षांच्या उन्हाळी शिबिरासाठी नेहमी आमंत्रित करीत असते. कल्पना चावला हिच्यानंतरचे म्हणजे १९९८ नंतर हे सतरावे उन्हाळी शिबिर आहे. समद्रिता ही भारताचे प्रतिनिधीत्व करणारी तेहतिसावी विद्यार्थिनी असून तिने सांगितले की, या संधीची आपण शाळेत दाखल झाल्यापासून वाटच पाहात होतो. विज्ञानाचे सखोल ज्ञान मि़ळवण्याची ही संधीच आहे. आपल्याला संशोधक व्हायचे असून त्या प्रयत्नातील हा मैलाचा दगड आहे.समद्रिता हिचे वडील केंद्रीय मृदा क्षारता संशोधन संस्थेत वैज्ञानिक असून तिची आई शिक्षिका आहे. तिला तिच्या आजोबांपासून प्रेरणा मिळालेली आहे. आपल्या आई-वडिलांनी  आपल्याला आईच्या वडिलांप्रमाणे संशोधक होण्यासाठी नेहमीच उत्तेजन दिले. आपले आजोबा हे पश्चिम बंगालमध्ये संशोधक होते. समद्रिताचा शाळेत सत्कार करण्यात आला. शाळेचे प्राचार्य राजन लांबा यांनी सांगितले, समद्रिताला आता वैज्ञानिकांशी संवाद साधण्याची संधी मिळेल. जगातील इतर विद्यार्थ्यांशी बोलण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांनी प्रकल्प सादर केल्यानंतर गुणवत्तेनुसारच विद्यार्थ्यांची नासाच्या शिबिरासाठी निवड होते.