काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप विरोधात बोलणाऱ्यांना संपवले जाते आहे असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकाही केली होती. ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर राहुल गांधी यांनी ही टीका केली होती. त्याचमुळे शुक्रवारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात चिकमंगलूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

राहुल गांधी हे जर याप्रकरणी दोषी आढळले तर त्यांना अटक करा, अशीही मागणी यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. तसेच राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माफी मागावी अशीही मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातील बातमी ट्विट केली आहे.

लोक म्हणतात पंतप्रधान शांत राहतात, कशावरही प्रतिक्रिया देत नाहीत. एखाद्या मुद्द्यावरून दबाव खूपच वाढल्यानंतर पंतप्रधानांना वाटते की, आता आपण काहीतरी बोलायलाच पाहिजे. पंतप्रधान मोदी हे कसलेले हिंदू राजकारणी आहेत. काही वेळा ते काही प्रतिक्रिया दबावाखाली देतात. मात्र त्यांची आणि त्यांच्या पक्षाची विचारसरणी ही चांगल्या माणसाला समाजातून हद्दपार करण्याचीच दिसून येते आहे. असेही राहुल गांधी यांनी बुधवारी म्हटले होते.

आता याच सगळ्या वक्तव्यावर चिडलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात पोलीस ठाणे गाठत तक्रार केली आहे आणि त्यांच्या अटकेचीही मागणी केली आहे.