कर्नाटकमधील समाज कल्याण मंत्री अंजनेय यांची पत्नी सात लाख रुपयांची रोकड स्वीकारताना एका वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये कॅमेऱ्यात कैद झाल्या. टेंडर मंजूर करण्यासाठीच ही लाच स्वीकारण्यात आल्याचा दावा संबंधित वृत्तवाहिनीने केलेला आहे.
अंजनेय यांच्या घरामधील एका खोलीत त्यांची पत्नी बसलेली असताना तिच्यासमोर ठेवलेल्या टेबलवर एका व्यक्तीने सात लाख रुपयांची रोकड ठेवल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले. सात कोटी रुपयांचे एक टेंडर मंजूर करून घेण्यासाठी ही लाच देण्यात आली असा दावा वृत्तवाहिनीने केला. दरम्यान, अंजनेय यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. आपल्या पत्नीला बदनाम करण्यासाठीच हे षडयंत्र रचण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
माझी पत्नी निर्दोष आहे. आम्हाला लाच स्वीकारण्याची काहीच गरज नाही. कुणीतरी कट रचून आम्हाला जाणीवपूर्वक बदनाम केले असल्याचे त्यांनी सांगितले. मी पैसे खाण्यासाठी राजकारणात आलेलो नाही. केवळ लोकांची सेवा करता यावी, यासाठी राजकारणात आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, कर्नाटक पोलिसांकडून याबद्दल अधिकृतपणे काहीही माहिती मिळाली नाही.