अफगाणिस्तानच्या गुप्त दौऱ्यावर गेलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची अफगाणिस्तानचे राष्ट्रपती हमिद करझाई यांनी भेट नाकारल्यामुळे दोन्ही नेत्यांमधील मतभेद पुन्हा एकदा जगासमोर आले आहे. अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
अध्यक्ष बराक ओबामांसोबत अफगाणिस्तानमध्ये गेलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारताचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्यासाठी हमिद करझाई भारत दौऱ्यावर गेले आहेत. तत्पूर्वी काबूलजवळील बागराम विमानतळावर उतरलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांची करझाई यांनी भेट घ्यावी, अशी इच्छा व्यक्त करण्यात आली होती,  मात्र करझाई यांनी भेटण्यास नकार दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अध्यक्ष बराक ओबामा हे अफगाणिस्तानात चांगली कामगिरी  केलेल्या आपल्या सैनिकांचे आभार मानण्यास गेले होते. या पाश्र्वभूमीवर अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमिद करझाई यांच्यासोबत त्यांच्या भेटीचे कोणतेही नियोजन केलेले नव्हते, तरीही करझाई यांना विमानतळावर भेटीचे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र अतिशय कमी वेळेत या भेटीचे आयोजन करण्यात आल्यामुळे करझाई यांनी भेटण्यास असमर्थता दर्शवली. मात्र त्याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटले नसल्याचेही अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट  केले.
दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये अमेरिकी फौजा ठेवण्याबाबतच्या कराराबाबत करझाई उत्सुक नसल्यामुळे दोन्ही नेत्यांमधील संबंध ताणले गेलेले आहेत. मात्र २०१४ नंतरही ओबामा अफगाणिस्तानमध्ये आपले १० हजार सैनिक ठेवण्याबाबत आग्रही असून लवकरच त्याबाबतची घोषणा करण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानमध्ये नव्याने येणारे राष्ट्रपतींसोबत द्विपक्षीय सुरक्षा करार करण्याबाबत सकारात्मक पावले उचलतील, असा विश्वास ओबामा यांनी अफगाणिस्तान दौऱ्यात व्यक्त केला आहे.
सीआयए अधिकाऱ्याच्या नावावर पांघरूण
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या अफगाणिस्तानच्या गुप्त दौऱ्यावरून वादंग उडालेला असतानाच व्हाइट हाऊसने या दौऱ्यावर असलेल्या सीआयएच्या अधिकाऱ्याचे नाव आधी प्रसिद्ध केल्यामुळे एकच खळबळ उडाली.मात्र चूक लक्षात येताच अधिकाऱ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ओबामा प्रशासनाकडून तातडीने नवीन यादी प्रसिद्ध करून ते नाव वगळले.  
अफगाणिस्तान दौऱ्यावरील अधिकाऱ्यांच्या नावांची यादी अमेरिकेच्या अधिकाऱ्यांकडून पत्रकारांना देण्यात आली. मात्र त्यामध्ये अमेरिकेची गुप्तहेर संघटना सीआयएच्या अधिकाऱ्याचेही नाव होते. मात्र ही चूक लक्षात येताच व्हाइट हाऊसने लागलीच नवीन यादी प्रसिद्ध केली. या नवीन यादीत मात्र सीआयएच्या त्या अधिकाऱ्याच्या नावाचा उल्लेख नसल्याचे आढळून आल्याचे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे.
सीआयए अधिकारी आणि त्याच्या कुटुंबीयांना धोका निर्माण होईल, म्हणून त्यांचे नाव प्रसिद्ध न करण्याची विनंती ओबामा प्रशासनाने केल्यामुळे प्रसारमाध्यमांनी नाव प्रसिद्ध केले नाही.
अमेरिकेच्या सीआयए या गुप्तचर संघटनेचे अनेक अधिकारी इतर देशांमध्ये हेरगिरी करीत असतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने या अधिकाऱ्यांची ओळख गुप्त ठेवण्यात येते. मात्र ओबामा यांच्या दौऱ्यातील सीआयए अधिकाऱ्याची ओळख उघड झाल्यामुळे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांची धावपळ झाली. ओबामा यांच्या गुप्त दौऱ्यादरम्यान बागराम विमानतळावर त्यांना लष्करी कारवाईबाबत माहिती पुरविणाऱ्या १५ वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये अफगाणिस्तानातील सीआयएच्या या अधिकाऱ्याचाही समावेश होता.