गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोरे प्रचंड धुमसत आहे. दहशतवादी कारवायांना येथे ऊत आला आहे. या दहशतवाद्यांना ठेचण्यासाठी लष्करानेही आक्रमक पवित्रा घेतला असून मागील आठवड्यात त्यांच्या प्रयत्नालाही यश आले आहे. काश्मीरमध्ये दोनच दिवसांपूर्वी भारतीय लष्कराने दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिदीनविरोधात आक्रमक कारवाई केली. गत आठवड्यात लष्कराने २४ तासात सुमारे १० दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. यातील सुमारे ६ जण हे हिजबुलचे कमांडर होते. २६ मे रोजी हिजबुलचा कमांडर सबझार अहमद याचा खात्मा केला होता. सबझार नंतर आता हिजबुलच्या कमांडरपदी सद्दाम पद्दारची नेमणूक केली जाईल, असे बोलले जात आहे. या संघटनेशी संबंधित सुमारे ११ क्रूरकर्मा दहशतवाद्यांबाबत ‘द टेलिग्राफ’मध्ये संकर्षण ठाकूर यांनी आढावा घेतला आहे.

या वृत्तानुसार, काश्मीर खोऱ्यात ११ क्रूरकर्मा दहशतवाद्यांपैकी ९ जणांचा खात्मा करण्यात आला आहे. उर्वरित दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांकडून तपास सुरू आहे. लष्कराने नुकताच हिजबुलच्या दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई केली आहे. सद्दाम पद्दार हा शोपियां जिल्ह्यातील आहे. त्याच्या कुटुंबीयांचा लाकडाचा व्यापार आहे. या वृत्तानुसार सद्दाम हाही बुरहान वानीबरोबर हिजबुलमध्ये सहभागी झालेल्या दहशतवाद्यांपैकी एक आहे.

हिजबुलच्या टॉप दहशतवाद्यांमध्ये सद्दाम पद्दारचे नाव आघाडीवर आहे. तर दुसरीकडे जाकिर मुसाने हिजबुलपासून वेगळं होण्याची घोषणा केली आहे तर तारिक पंडितने शरणागती पत्करली होती. बुरहान वानी हा हिजबुलचा मारला गेलेला पहिला दहशतवादी होता. त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. बुरहानशिवाय ज्या ८ दहशतवाद्यांना मारण्यात आले त्यांची नावे आदिल खांडे, निसार पंडित, आफाक भट, सबझार भट, अनीस, इशफाक दार, वसीम मल्लाह आणि वसीम शहा अशी आहेत. लष्कराने मोठ्या महत्प्रयासाने या ९ दहशतवाद्यांना चकमकीत मारले होते.

काही माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, रियाज अहमद नीकूलाही हिजबुलच्या कमांडरपदी नेमले जाऊ शकते. गेल्या काही काळापासून दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी धुमाकूळ घातला आहे. जम्मू काश्मीर पोलिसांच्या मते, काश्मीर खोऱ्यात सक्रीय २८२ दहशतवाद्यांमध्ये ११२ दक्षिण काश्मीरमधील आहे. यामध्ये ११२ पैकी ९९ दहशतवादी स्थानिक आहेत.