काश्मीरमध्ये हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वाणी याला मारल्यानंतर काश्मीर खो-यात अजूनही तणावाचे वातावरण आहे. काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी या मुद्यावर सुरक्षा यंत्रणेपेक्षा वेगळी भूमिका मांडली आहे.जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्हय़ातील चकमकीत बुरहान असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेला असती, तर ही कारवाई वेगळ्या पद्धतीने नियंत्रित करण्यात आली असती, असे मेहबूबा यांनी म्हटले आहे. लष्कर आणि स्थानिक पोलिसांच्या काश्मीरमधील संयुक्त कारवाईत बुरहान वानी याच्यासह दोन दहशतवादी चकमकीत मारले गेल्यानंतर परिसरात दंगल उसळली होती. आतापर्यंत काश्मीरमधील या हिंसाचारात ५० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५ हजारहून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तब्बल ३ हजार सैनिकांचा समावेश आहे. दरम्यान, पीपल्स डेमोक्रॉटीक पार्टीचे नेते मुज्जफर बेग यांनी सुरक्षा दलावरील कारवाईवर आक्षेप नोंदविला आहे. बुरहान वानी याच्यावरील कारवाईवेळी सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. बुरहान तसेच त्याच्या अन्य दोन साथीदारांना आत्मसमर्पण करण्याची संधी सुरक्षा यंत्रणेने दिली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. हिजिबुल मुजाहिदीनचा बुरहान वानी याच्या अंत्ययात्रेला शेकडो काश्मिरींनी गर्दी केली होती.त्यानंतर हिंसाचाराचा आगडोंबच काश्मीर खोऱ्यात उसळला होता.अलीकडच्या काळात काश्मीरमध्ये सत्तेत आलेले पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या मेहबूबा मुफ्ती आणि भाजपचे एकत्रित सरकार. असे समीकरण काश्मीरमध्ये प्रथमच अस्तित्वात आले आहे.