काश्मीर खोऱ्यातील स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याने अनंतनाग शहरवगळता अन्य ठिकाणी जारी करण्यात आलेली संचारबंदी गुरुवारी उठविण्यात आली.

काश्मीरच्या दक्षिण भागांत असलेल्या अनंतनाग शहरवगळता खोऱ्यात अन्यत्र कोठेही संचारबंदी नसल्याचे पोलिसांनी सांगितले. स्थिती सुधारल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

बुधवारी संपूर्ण खोऱ्यातील स्थिती शांत होती. खोऱ्यात कोठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त आले नाही. कुलगाम जिल्हा आणि अनंतनाग शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बुधवारी तेथे पुन्हा एकदा संचारबंदी जारी करण्यात आली होती.

श्रीनगर शहरातील खान्यार, रैनावारी, महाराजगंज, साफा कंदाल आणि नौहात्ता येथेही संचारबंदी जारी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे काही ठिकाणी जमावबंदीचेही आदेश देण्यात आले होते. मात्र गुरुवारी शहरांत कोणत्याही प्रकारचे र्निबध लादण्यात आले नाहीत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.