काश्मीरमध्ये गेल्या दीड महिन्यांपासून सुरु असलेल्या हिंसाचार क्षमवण्यासाठी गृहमंत्री राजनाथ सिंह हे काश्मीरमध्ये दाखल झाले. पण तासाभरापूर्वी पुन्हा उसळलेल्या दंग्यात एका आंदोलकाचा मृत्यू झाला आहे. दक्षिण काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात काही आंदोलनकर्त्यांनी मोर्चा काढला होता. हा मोर्चा ज्या दिशेने काढण्यात आला होता तो रस्ता सुरक्षेच्या कारणास्तव सैनिकांनी बंद केला. परंतु नंतर झालेल्या चकमकीत आंदोलनकर्त्यांना थोपवण्यासाठी सैनिकांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. जमावाकडूनही सैनिकांवर दगडफेक करण्यात आली त्यामुळे सैनिकांनी आंदोलनकर्त्यांवर गोळीबार केला, यात एकचा मृत्यू झाला. रुग्णालयात दाखल करत असताना त्याचा मृत्यू झाल्याचे समजते. मोहम्मद आमीर मीर असे मृत झालेल्या आंदोलकाचे नाव समजते आहे. या कारावाईत २० ते २५ जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानी मारला गेल्यानंतर गेल्या दीड महिन्यापासून काश्मीरमध्ये हिंसाचाराचे वातावरण आहे. यात आतापर्यंत ६५ हून अधिक लोक मारले गेले आहेत. तर गोळ्या लागून आणि दगडफेकींमुळे आतापर्यंत ५ हजारांहून अधिक सुरक्षारक्षक आणि नागरिक जखमी झाले आहेत. गेल्या ४८ दिवसांपासून काश्मीरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राजनाथ सिंह हे काश्मीरच्या दौ-यावर आहेत, त्यामुळे येथील सुरक्षाही ही अधिक कडक करण्यात आली आहे. आपल्या दोन दिवसांच्या दौ-यात काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ते काश्मीरच्या नागरिकांनी आणि इतर राजकिय पक्षाक्षी चर्चा करणार आहेत.