जम्मू काश्मीरमध्ये बंदमुळे गेल्या १११ दिवसांपासून शाळा बंद आहेत आणि राज्यातील विद्यार्थ्यांचे वर्ष शैक्षणिक अंधारमय झाले आहे. मात्र हुर्रियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष सय्यद अली शाह गिलानी यांच्या नातवाची शाळा सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. १ ते ५ ऑक्टोबरदरम्यान श्रीनगरमधील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये कडेकोट बंदबस्तात ५७३ मुलांनी परीक्षा दिली असून विशेष म्हणजे हुर्रियतचे अध्यक्ष सय्यद अली शाह गिलानी यांची नात याच शाळेत शिकत आहे.

बुरहान वानीचा भारतीय सैन्याने खात्मा केल्यानंतर हुर्रियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष सय्यद अली शाह गिलानी यांनी जम्मू काश्मीर बंदची हाक दिली आहे. जम्मू काश्मीरमधील अशांततेमुळे तब्बल १११ दिवसांपासून राज्याभरातील शाळा बंद असून काही पालकांनी बंदमधून शाळांना वगळावे अशी मागणीदेखील केली. पण त्यानंतरही शाळा सुरु होऊ शकलेल्या नाहीत. हुर्रियतचे अध्यक्ष गिलानी यांचे ज्येष्ठ चिरंजीव डॉ. नईम गिलानी हे श्रीनगरमध्ये राहत असून ते हुर्रियतमध्ये सक्रीय नाहीत. नईम यांची मुलगी श्रीनगरच्या दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये १० वी इयत्तेत शिकते. इंडियन एक्सप्रेसला मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये ९ वी आणि १० वीतील ५७२ विद्यार्थ्यांची परीक्षा १ ते ५ ऑक्टोबर या कालावधीत पार पडली. कडेकोट बंदोबस्तात ही परीक्षा पार पडली आहे.

फुटिरतावादी गटांनी काही दिवसांसाठी आंदोलन थांबवले होते. त्याच दरम्यान परीक्षा पार पडल्या असे नईम यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले. माझ्या मुलीने परीक्षा दिली नसती तर तिचं शैक्षणिक वर्ष वाया गेले असते आणि तिच्या भावी वाटचालीत अडथळे आले असते असेही त्यांनी नमूद केले. आम्ही परीक्षा किंवा शाळेत उपस्थित राहण्यास विरोध दर्शवलेला नाही. आम्ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाविरोधात नाही असेही ते म्हणालेत.

डीपीसी शाळेचे उपाध्यक्ष विजय धर यांनी या वृत्ताला दुजोरा दिली. गिलानींची नात आमच्या शाळेत आहे. पण ती परीक्षेला बसली की नाही हे माहीत नाही. ९ वी आणि १० वीतील ५८० मुलांपैकी ७ विद्यार्थी परीक्षेला गैरहजर होते असे धर यांनी सांगितले.धर हे डी पी धर यांचे ज्येष्ठ चिरंजीव असून धर हे गांधी – नेहरु घराण्याचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. सुरुवातीला परीक्षा अन्यत्र घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शेवटी इनडोअर स्टेडियममध्येच ही परीक्षा घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. शाळा सुरु होऊ नये म्हणून आंदोलकांनी गेल्या काही दिवसांमध्ये ३ शाळांमध्ये आग लावल्याची घटना समोर आली होती.