सलग तिसऱ्या दिवशी काश्मीर खोऱ्यात तुफान बर्फवृष्टी झाल्यामुळे जम्मू काश्मीरमधील जनजीवन गुरुवारीही विस्कळीत झाले. मोठय़ा प्रमाणात बर्फ साचल्यामुळे श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद पडला आहे. त्यामुळे काश्मीरचा देशाच्या इतर भागाशी संपर्क तुटला आहे. सततच्या बर्फवृष्टीमुळे काश्मीर गारठले असून पहलगाम येथे रात्रीचे तापमान उणे १२.२ अंश सेल्सियस इतके कमी नोंदले गेले आहे.
राष्ट्रीय महामार्ग दिवसभर बंद राहिला. त्यामुळे वाहनांची मोठी रांग लागलेली होती. परंतु दुपारनंतर हळूहळू वाहतूक पुढे सरकत होती. काश्मीर खोऱ्याचे प्रवेशद्वार असणाऱ्या काझीगुंड येथील तापमान उणे २.८ अंश सेल्सियस तर कोकरनाग, कुपवाडा आदी भागातही उणे चार पर्यंत तापमान नोंदले गेले. श्रीनगरमध्ये उणे २.१ अंश सेल्सियस तापमान असून सर्वाधिक कमी लडाखमधील लेहमध्ये तब्बल उणे १५.३ इतके नोंदले गेले.
महामार्ग आज खुला ?
गेले तीन दिवस बंद असलेला श्रीनगर-जम्मू महामार्ग शुक्रवारपासून एकमार्गी वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. हा महामार्ग बंद असल्यामुळे काश्मीर खोऱ्याचा देशाच्या इतर भागाशी संपर्क तुटलेला आहे. ३०० किमी लांबीच्या या महामार्गावर बर्फवृष्टीमुळे प्रवासी तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत.