‘बँड इन’ या संगीत अकादमीतर्फे चालवल्या जाणाऱ्या काश्मिरी मुलींच्या रॉकबँड पथकातील मुलींना धमक्या आल्यानंतर या बँडचे कामच भीतीने बंद करण्यात आल्याच्या वृत्तानंतर आता समाजातील विविध घटकांतील लोकांनी सोशल नेटवर्किंग साईटवर त्यांच्या या बँडला पाठिंबा दिला आहे.
काश्मिरात मुलींचा हा पहिलाच बँड असून, या सर्व दहावीत शिकत असलेल्या मुली आहेत. फेसबुकवर लोकांनी दिलेल्या प्रतिक्रियांनी तीन पाने भरली आहेत. प्रगाश (प्रकाश) नावाने सुरू असलेल्या या बँडमधील मुलींनी अजिबात घाबरून जाऊ नये, आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहोत असे अनेकांनी म्हटले आहे.
या प्रकरणी ‘आय सपोर्ट प्रगाश, काश्मिर्स फर्स्ट गर्ल्स रॉक बँड’ या नावाने एक पानच फेसबुकवर तयार करण्यात आले असून, त्याला एक हजार लाइक्स मिळाले आहेत. दोनच दिवसांपूर्वी हे पान फेसबुकवर तयार करण्यात आले आहे. गेल्या डिसेंबरमध्ये काश्मिरातील मुलींचा हा रॉकबँड स्थापन करण्यात आला होता. पहिल्याच सार्वजनिक स्पर्धेत त्यांना पहिला पुरस्कारही मिळाला होता
कनू शर्मा या पानावर लिहितात.. मी तुमच्या समवेत आहे. कलेतील विशिष्ट लोकांपैकी तुम्ही आहात. तुमच्यावर सतत परमेश्वराचा वरदहस्त आहे म्हणूनच सर्वजण कलाकार नसतात.
जे लोक सोशल नेटवर्किंगमध्ये अभिव्यक्तिस्वातंत्र्याची मागणी करतात तेच अशा प्रकारे या मुलींना धमक्या देऊन भीती घालत आहेत ही मान खाली घालायला लावणारी गोष्ट आहे, असे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
धमक्यांची पोलीस चौकशी करण्याच्या त्यांच्या निर्णयाचे त्यांच्या ट्विटर अनुयायांनी स्वागत केले आहे, पण काश्मीरमधील पहिला रॅपर मॅकाश याने २०१० मध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या अत्याचाराचा जो निषेध केला होता त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली, त्याबाबत ओमर यांनी त्या वेळी मौन का बाळगले, असा सवाल करण्यात आला आहे.
शाहीद झोर यांनी ट्विटरवर म्हटले आहे, की प्रगाश बँडला माझा पाठिंबा आहे, पण जेव्हा तुम्ही अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या गोष्टी करता तेव्हा मी मॅकाशलाही पाठिंबा देत आहे. ओमर अब्दुल्ला यांनी त्यावर ट्विट केलेले नाही. श्रीजिथ यांनी म्हटले आहे, की माझा या बँडला पाठिंबा आहे. काश्मीर भारतात आहे. अतिरेक्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानात नाही. आपण तंत्रज्ञान युगात राहतो. भारतातील मुस्लिमांनी जगातील इतर मुस्लिमांपेक्षा पुढेच असले पाहिजे.
सेहला रशीद शोरा यांनी त्यावर असा प्रतिवाद केला आहे, की हा संपूर्ण जगाचाच प्रश्न आहे. महिलाद्वेषाचा हा प्रश्न काश्मीरपुरता मर्यादित नाही. लोकांनी आवाज उठवला म्हणून त्या प्रश्नाला मान्यता मिळाली आहे. मंगलोर येथे रा.स्व.संघाच्या महिला शाखेने बारमध्ये धूम्रपान करणाऱ्या महिलांवर हल्ला केला होता हे तुम्ही ऐकले असेल.
त्यावर नेटीझन सारा आलम म्हणतात, की महिलाद्वेष हा पाकिस्तानचा विशेषाधिकार नाही. झुमरी तलय्यापासून ते टिम्बक्टूपर्यंत तो सगळीकडे आहे, त्यामुळे एकमेकांवर आरोपांचा खेळ थांबवा.