देशभरातील काश्मिरी विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सर्व राज्य सरकारांना दिले आहेत. इतर नागरिकांप्रमाणे तेही भारतीय नागरीक आहेत, असेही त्यांनी ठासून सांगितले. राजस्थानमधील मेवाड विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या सहा काश्मिरी विद्यार्थ्यांना चित्तोरगढ जिल्ह्यातील बाजारात स्थानिकांनी मारहाण केली. यात ते जखमी झाले. या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी चिंता व्यक्त केली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत काश्मिरी विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे निर्देश त्यांनी सर्व राज्य सरकारांना दिले आहेत.

काश्मिरी आपल्याच कुटुंबीयांपैकी एक आहेत, असेही राजनाथ सिंह म्हणाले. काश्मिरी विद्यार्थ्यांना त्रास देणाऱ्या अथवा त्यांच्याशी उगाचच वाद घालून मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे आदेशही त्यांनी राज्य सरकारांना दिले आहेत. भारताच्या विकासात काश्मिरी युवकांचेही योगदान आहेत. त्यामुळे त्यांना लक्ष्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

 

‘काश्मिरी तरुणांनी उत्तर प्रदेश सोडावे’

उत्तर प्रदेश नवनिर्माण सेना या संघटनेने मेरठ-डेहराडून महामार्गावर पोस्टर लावले आहेत. त्यात उत्तर प्रदेशात राहणाऱ्या काश्मिरी तरुणांनी राज्यातून निघून जा, असा इशारा दिला आहे. ३० एप्रिलनंतर काश्मिरी तरुणांविरोधात हल्लाबोल करणार असल्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. संघटनेच्या या इशाऱ्यानंतर गुप्तचर विभाग आणि शैक्षणिक संस्था सतर्क झाल्या आहेत. तसेच काश्मिरी विद्यार्थ्यांना भाड्याने घरेही देऊ नका, असे आवाहन त्यांनी राज्यातील लोकांना केले आहे. काश्मीरमध्ये लष्कराच्या जवानांना विरोध करणाऱ्या कुटुंबातील काही तरुण येथे शिक्षण घेत आहेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना येथे त्रास झाला तरच काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांना ‘धडा’ मिळेल, असेही या संघटनेचे म्हणणे आहे. काश्मिरी युवकांनी ३० एप्रिलपर्यंत उत्तर प्रदेशातून निघून जावे, अन्यथा त्यांची हाडे मोडू, अशी धमकीच संघटनेने दिली आहे. या तरुणांना कुणीही भाड्याने घरे देऊ नयेत, तसेच त्यांना दुकानांतून वस्तूही देऊ नका, असे आवाहन त्यांनी मेरठमधील लोकांना केले आहे.