‘माझे लहान मुल उपाशी आहे, त्याला दूध हवे आहे आणि त्या मुलाचा वडील म्हणून मी त्याच्यासाठी साधे दूधही आणू शकत नाही. का? तर बाहेर संचारबंदी आहे’. ‘घरात आई आजारी आहे तिला रुग्णालयात न्यायचे आहे पण भिती वाटते. दंगे उसळले आणि आम्ही जीव गमावला तर ?’ ‘घरातला किराणा संपला आहे पण परिस्थितीपुढे आम्ही हतबल आहोत?’ ‘फोन, इंटरनेट बंद आहेत. अडचण आलीच तर काय करायचे ?’ गेल्या महिन्याभरापासून काश्मीरी लोकांचे हे प्रश्न आहेत. संचारबंदीमुळे दैनंदिन जीवन विस्कटलेले काश्मीरी लोक हाच प्रश्न दबक्या आवाजात विचारत आहेत. काश्मीरमधील परिस्थितीची ही दुसरी बाजू. गेल्या दीड महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेली ही परिस्थिती आज तरी बदलू दे अशी दुवा काश्मीरी लोक गेल्या काही दिवसांपासून मागत असतील. अखेर त्यांची दुवा कबुल व्हायला ५१वा दिवस उजाडावा लागला. कारण तब्बल ५१ दिवसांनंतर काश्मीरमधली संचारबंदी उठण्यात आली आहे. आतापर्यंत काश्मीरच्या इतिहासातील ही सगळ्यात मोठी संचारबंदी असेल.

जुलै महिन्यात हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीला ठार केल्यानंतर काश्मीर खो-यातील विविध जिल्ह्यांत हिंसाचार उसळला होता. दगडफेक, महामार्गांची अडवणूक, जाळपोळ करत स्थानिक दंगेखोरांनी येथील परिस्थिती आणखी चिघळली होती. दंगेखोरांना थोपवण्यासाठी काश्मीर खो-यात अतिरिक्त सीआरपीएफ जवान तैनात करण्यात आले होते, पण  परिस्थिती काही नियंत्रणाखाली येण्याचे नाव घेत नव्हती. गेल्या ५० दिवसांपासून सुरू असलेल्या या हिंसाचारात आतापर्यंत ६८ जण मारले गेले, तर ४ हजारांहून अधिक काश्मीरी लोक जखमी झाले. हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून २४ तास डोळ्यांत तेल घालून काम करणा-या जवानांना देखील लोकांच्या रोषाला समोरे जावे लागले. आतापर्यंत ६ हजारांहून अधिक जवान यात जखमी झाले आहेत. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे सीमेवरून दहशतवादी हल्ले देखील सुरूच होता. या संपूर्ण प्रकरामुळे जवळपास १५ लाखांहून अधिक लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते. संचारबंदी उठवल्यामुळे काश्मीरमध्ये ठप्प झालेले जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. असे असले तरी काश्मीरमधली संचारबंदी ही पूर्णपणे उठवण्यात आली नाही. सुरक्षेच्या कारणास्तव श्रीनगरमधील काही भागांत आणि पुलवामा जिल्ह्यात ही संचारबंदी मात्र कायम ठेवण्यात आली आहे.