निवृत्त न्यायाधीश मरकडेय काटजू यांची टीका

दिल्लीत बहुमताच्या जोरावर सत्तेत आलेला आम आदमी हा विदूषकांचा पक्ष असल्याची टीका सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष मरकडेय काटजू यांनी केली आहे.
अनेक वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत राहणाऱ्या काटजू यांनी ‘स्वराज्य’ पुस्तकाचे लेखक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, गांधीवादी समाजसेवक अण्णा हजारे यांची खिल्ली उडवली. अण्णांचे आंदोलन म्हणजे क्रांती नव्हती. त्यांना अकारण महत्त्व देण्यात आल्याचे काटजू म्हणाले. ग्रामसभांना प्रबळ बनवून अधिकार देण्याची भाषा करणाऱ्या केजरीवाल यांना या ग्रामसभा जात व वर्गभेदाच्या प्रतीक असल्याची माहिती नाही का, असा प्रश्न त्यांनी विचारला.
दिल्लीत प्रेस क्लब ऑफ इंडियात ‘भडासफॉरमीडिया’ने आयोजित केलेल्या परिसंवादात काटजू यांनी केंद्र सरकारच्या धोरणांपासून ते माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना मनसोक्त झोडपले. मनमोहन सिंग दहा वर्षे सत्तेत बसून राहिले. त्यांच्याकडे समस्या घेऊन गेल्यावर ते केवळ एकच- ‘आय एम नॉट ए फ्री मॅन’ पालुपद ऐकवत असत. सारे निर्णय १०, जनपथवर होतात- असेही मनमोहन सिंग कळवळून सांगत.
गंगा स्वच्छता अभियान म्हणजे निव्वळ फार्स असल्याचे सांगून काटजू यांनी आपला मोर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वळविला. औद्योगिक क्षेत्राने हे प्रदूषण रोखले पाहिजे. ते होताना दिसत नाही. कारण गंगा स्वच्छतेसाठी होणाऱ्या खर्चाच्या केवळ एक टक्के लाच स्थानिक अधिकाऱ्याला देऊन अनेक कारखाने आपले काम करून घेतात. हा भ्रष्टाचार जोपर्यंत थांबत नाही, तोपर्यंत गंगा स्वच्छ होणार नाही. गेली चाळीस वर्षे न्यायव्यवस्थेत राहूनही या व्यवस्थेवर आपला विश्वास नाही, अशी कबुली काटजू यांनी दिली.
न्यायव्यवस्था भ्रष्ट आहे. २५ वर्षांनंतरही लोकांना न्याय मिळत नाही. प्रसारमाध्यमांवर बंधनं नसावीत परंतु नियमन असावे- अशी भूमिका मांडताना काटजू म्हणाले की, व्यावसायिक चौकटीबाहेर वर्तन केल्यास डॉक्टर, वकील, सीए वा अन्य कोणत्याही व्यावसायिकावर कारवाई होते. तशी कारवाई प्रसारमाध्यमांवर व्हायला हवी, परंतु प्रसारमाध्यमांना हे मान्य नाही. स्वयंनियमनाच्या नावावर स्वातंत्र्याचा गैरवापर केला जातो. विशेषत: इलेक्ट्रॉनिक माध्यमे सर्रास उल्लंघन करतात. त्यासाठी सरकारने नियमनाची आत्यंतिक गरज आहे. तिच्यावर कार्यवाही हवी.