ज्योतिर्लिंग यात्रेमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या ११ व्या ज्योतिर्लिंगाचे म्हणजेच केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाऊबीजेच्या मुहूर्तावर बंद करण्यात आले. सकाळी ८ वाजून २० मिनिटांच्या मुहूर्तावर मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले असून, पुढील सहा महिन्यांसाठी केदारनाथ मंदिराऐवजी उखीमठ ओंकारेश्वर मंदिरात दररोजची पूजा करण्यात येणार आहे.

हिमालयातीस पर्वतरागांमध्ये असणाऱ्या केदारनाथ मंदिराचे दरवाजे रितीरिवाज आणि संपूर्ण परंपरांसह बंद सहा महिन्यांसाठी करण्यात येतात. आजही मोठ्या भक्तिमय वातावरणात मंदिराच्या गर्भगृहाचे दरवाजे सकाळी सहा वाजता बंद करण्यात आले. त्यानंतर केदारनाथाची पालखी मंदिराबाहेर आणण्यात आवी. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास शास्त्रोक्त पद्धतीने मंत्रोच्चारण करत मंदिराचे दरवाजे पूर्णपणे बंद केले गेले. यावेळी मुख्य पूजारी बागेश लिंग, रावल भीमाशंकर लिंग यांच्यासह जवळपास दोन हजारहून अधिक भाविक याठिकाणी उपस्थित होते.

यावेळी सर्वांचाच उत्साह पाहण्याजोगा होता. त्या वातावरणामध्ये केदारनाथच्याच नावाचा जयघोष सुरु होता. या जयघोषातच मंदिराचे दरवाजे बंद झाल्यानंतर पालखीचं प्रस्थान झालं असून, रामपूर या पहिल्या मुक्कामाच्या दिशेने पालखी मार्गस्थ झाली. रामपूरमध्ये मुक्कामी राहिल्यानंतर २२ ऑक्टोबरला ही पालखी दुसऱ्या दिवशी फाटा, नारायणकोटी आणि त्यानंतर रात्रीच्या वास्तव्यासाठी विश्वनाथ मंदीर गुप्तकाशी येथे पोहोचेल असं वृत्त ‘नवभारत टाइम्स’ने प्रसिद्ध केलं आहे.

वाचा : अंमली पदार्थाचा अल्पवयीन मुलांना विळखा

२३ ऑक्टोबरला विश्वनाथ मंदिर येथून मार्गस्थ झालेली ही पालखी उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिरात पोहोचेल जेथे केदारनाथ विराजमान होतील. पुढील सहा महिन्यांसाठी भक्तांना येथेच केदारनाथाचे दर्शन घेता येईल.