दिल्लीत आम आदमी पक्षाच्या सरकारला काम करू देण्याची विनंती करून अप्रत्यक्षपणे टीकेची पोस्टरबाजी करणाऱ्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पहिल्यांदाच केंद्र सरकारकडून थेट अडचणीत आणण्यात येणार आहे. केजरीवाल यांचे सचिव राजेंद्र कुमार यांच्यावर असलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सीबीआयने आवश्यक कागदपत्रे जमविण्यास सुरुवात केली आहे, तर नायब राज्यपालांचा आदेश नसताना गृह सचिवपदाचा कारभार पाहणाऱ्या राजेंद्र कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाने नोटीस बजावली आहे. राजेंद्र कुमार केजरीवाल यांचे निकटवर्तीय अधिकारी मानले जातात. केजरीवाल यांच्या ४९ दिवसांच्या कार्यकाळातदेखील ते केजरीवाल यांचे सचिव होते.