दिल्ली महापालिका निवडणुकीतील पराभवातून सावरण्याचा प्रयत्न आम आदमी पक्षाकडून सुरु आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पक्षाच्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन केले आहे. ‘जागरुक राहा, प्रामाणिक राहा,’ असा सल्ला अरविंद केजरीवाल यांनी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना दिला. यासोबतच पक्ष कधीही सोडणार नाही, अशी शपथदेखील केजरीवाल यांनी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी दिली. भाजपने पक्षांतर करण्याची ‘ऑफर’ दिल्यास ती ऑफर रेकॉर्ड करा, असेदेखील केजरीवाल यांनी ४८ नगरसेवकांना सांगितले आहे.

‘ते तुम्हाला खूप मोठी ऑफर देतील. १० कोटीदेखील देतील. तुम्ही जर ऑफर स्विकारली, तर तुम्हाला पुढे जाऊन पश्चाताप होईल. आयुष्यभर तुम्हाला याची किंमत मोजावी लागेल,’ असे अरविंद केजरीवाल नवनिर्वाचित नगरसेवकांना म्हणाले. ‘ईश्वराला साक्षी ठेवून मी कधीही हा स्वच्छ प्रतिमेचा पक्ष सोडणार नाही आणि भ्रष्टाचारविरोधी मोहिमेशी प्रतारणा करणार नाही,’ अशी शपथ केजरीवाल यांनी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना दिली.

दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला. पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी आम आदमी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची आज (गुरुवारी) बैठक झाली. पंतप्रधान मोदी यांची वाढती ताकद पाहता, त्यांच्याविरुद्ध संघर्ष करणे सध्या अवघड असल्याचा निष्कर्ष या बैठकीत काढण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: मतदारांना करत असलेले आवाहन यांच्यामुळे भाजपला फायदा होत आहे, असे मत या बैठकीत आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केले. काल (बुधवारी) दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये भाजपने सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत हॅट्रिक साजरी केली. विशेष सत्ताधाऱ्यांविरोधातील नाराजीचा मुद्दा असूनही भाजपने आधीच्या तुलनेत जास्त जागा जिंकत मोठा विजय मिळवला.

‘शेजारच्या उत्तर प्रदेशातील दमदार विजयाचा फायदा भाजपला दिल्लीतदेखील झाला. मात्र या विजयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा वाटा होता. उत्तर प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक जनसभा घेतल्या होत्या. यासोबतच रोड शोदेखील केले होते,’ असे मत आम आदमी पक्षाच्या अनेक नेत्यांनी निवडणुकीनंतर झालेल्या पक्षाच्या बैठकीत व्यक्त केले.