नासाच्या केप्लर मोहिमेच्या नवीन टप्प्यात प्रथमच एक बाहयग्रह सापडला असून तो पृथ्वीपासून १८० प्रकाशवर्षे दूर आहे. त्याचे वर्णन ‘महापृथ्वी’ असे करण्यात आले आहे.
 केंब्रिजमधील हार्वर्ड स्मिथ सॉनियन सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोफिजिक्स या संस्थेचे मुख्य संशोधक  अँड्रय़ू व्ॉन्डरबर्ग यांनी केप्लर २ मोहिमेतील माहितीच्या आधारे हा ग्रह शोधून काढला आहे. केप्लर २ मोहीम फेब्रुवारी २०१४ मध्ये सुरू करण्यात आली आहे. या ग्रहाचे नामकरण एआयपी ११६४५४ बी असे असून त्याचा व्यास पृथ्वीच्या अडीचपट आहे. त्याच्या मातृताऱ्याभोवती एक प्रदक्षिणा करण्यास त्याला नऊ दिवस लागतात.
 हा मातृतारा मात्र सूर्यापेक्षा थंड असून लहानही आहे, जीवसृष्टीसाठी तो जास्त उष्ण ग्रह आहे. एचआयपी ११६४५४ बी हा ग्रह व त्याचा मातृतारा पृथ्वीपासून १८० प्रकाशवर्षे दूर व मीन तारकासमूहात आहे. हार्पस – नॉर्थ स्पेक्ट्रोग्राफ या कॅनडी बेटांवरील यंत्राच्या मदतीने घेण्यात आलेल्या मापनांच्या आधारे या शोधाची निश्चिती करण्यात आली आहे.
 ग्रहाच्या गुरूत्वीय प्रभावाने निर्माण होणारी ताऱ्यातील थरथर टिपण्यात आली आहे. हार्पस एन या यंत्राच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार या ग्रहाचे वजन पृथ्वीच्या १२ पट असून त्यामुळे तो महापृथ्वी या ग्रहगटात गणला जाईल. या प्रकारचे वजनदार ग्रह आपल्या सौरमालेत आढळत नाहीत.  
अभियंते व खगोलशास्त्रज्ञांनी केप्लर दुर्बीणीची निरीक्षण मोहीम पुन्हा सुरू केली होती. गेल्या उन्हाळ्यात त्याचे रिअ‍ॅक्षन व्हील नादुरूस्त झाले होते, पण तरीही या मोहिमेचे पुनरूज्जीवन करण्यात यश आले असे नासाच्या खगोलभौतिकी विभागाचे संचालक पॉल हर्टझ यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, नासा व बॉल एरोस्पेस चमूचे आभार मानायला हवेत, कारण दुसऱ्या मोहिमेत प्रथमच एका बाह्य़ग्रहाचा शोध लागला आहे. यापुढे वेब अवकाश दुर्बिणीच्या मदतीने त्याचा मागोवा घेतला जाईल.अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नलमध्ये हा संशोधन निबंध प्रकाशित होणार आहे.

‘केप्लर दोन’ मोहीम
मे २०१३ मध्ये केप्लर दुर्बीण दुरूस्त करून ही मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली. केप्लर दुर्बिणीने आतापर्यंत ३५ हजार ताऱ्यांचे निरीक्षण केले असून तारकासमूहांची माहिती उपलब्ध केली आहे. ताऱ्यांची निर्मिती होत असेलल्या भागांचा शोध घेतला आहे, आपल्या सौरमालेतही अनेक ग्रहीय घटकांचा शोध लावला आहे.