केरळमधील कन्नूर जिल्ह्यात भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. मुल्लाप्रम एज्युथान संतोष (वय ५२) असे या कार्यकर्त्याचे नाव असून बुधवारी रात्री ते घरी असताना त्यांची हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या हत्येमागे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया – मार्क्सवादी (सीपीआय-एम) चा हात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. या हत्येच्या निषेधार्थ भाजपने कन्नूर बंदची घोषणा केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी काही जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली जात आहे. ही राजकीय हत्या असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

संतोष हे बुधवारी रात्री घरी एकटे असताना अज्ञात व्यक्तीने ११ वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर हल्ला केला. शेजारच्यांनी व पोलिसांनी त्यांनी उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतानाचा त्यांचा मृत्यू झाला. संतोष यांच्या मागे आई, पत्नी आणि दोन मुले आहेत. संतोष यांच्या हत्येच्या निषेधार्थ जिल्हा भाजपने गुरूवारी बंद पुकारला आहे. भाजपने राज्यातील कम्युनिस्ट सरकारला जाब विचारला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघानजीकच ही घटना घडली आहे.
मागील पंचायत निवडणुकीत संतोष हे भाजपचे उमेदवार होते. गतवर्षी कन्नूरमध्ये सुमारे सहा पक्ष कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि सीपीआय-एमच्या दोन कार्यकर्त्यांचा समावेश आहे.