राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशावर विशिष्ट विचारसरणी लादू पाहतोय. या माध्यमातून त्यांना भारताची समाजाची ‘हिंदू’, ‘हिंदी’, ‘हिंदूस्तान’ अशा कप्प्यांमध्ये विभागणी करायची आहे, असा आरोप केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केला. ते शुक्रवारी चेन्नई येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या नियंत्रणात असलेल्या भाजपला देशाची संघराज्यीय रचना मोडीत काढायची आहे. त्यासाठी संघाला राज्यांना दुबळे करायचे आहे. त्यामुळे ते संघराज्यीय पद्धतीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जेणेकरून त्यांना समाजात ‘हिंदू’, ‘हिंदी’, ‘हिंदूस्तान’ असे कप्पे पाडणे शक्य होईल. भाजपकडूनही तेच धोरण राबविण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, आपण ते हाणून पाडले पाहिजे, असे विजयन यांनी म्हटले. भारत हा बहुभाषिक, बहुसांस्कृतिक देश आहे. या ठिकाणी आचार-विचाराचे स्वातंत्र्य आणि मतभिन्नतेला स्थान आहे, हीच संकल्पना मुळात संघाला मान्य नाही. त्यामुळे संघाकडून देशावर एक संस्कृती, एक भाषा ही विचारसरणी लादण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

केरळमध्ये संघ-माकप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, संघाच्या लोकांनी बॉम्ब फेकल्याचा आरोप

यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षावरही निशाणा साधला. काँग्रेसनेच सर्वप्रथम संघराज्यीय पद्धतीवर हल्ला करायला सुरूवात केली, भाजपच्या काळात फक्त त्याच्या मर्यादा विस्तारल्या, असे विजयन यांनी म्हटले. भारतीय घटनेत संघराज्यीय पद्धतीचाच आग्रह धरण्यात आला आहे. त्यामुळे संविधान आणि लोकशाही जपण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सध्या केंद्र सरकार राज्यांचे हक्क डावलताना दिसत आहे. निती आयोगाची स्थापना करून राज्यांना असणारे आर्थिक हक्क काढून घेण्याचा प्रयत्न सरकारने चालवला आहे, असेही विजयन यांनी सांगितले.