अर्णब गोस्वामी हा भित्रा आणि मुल्यांची चाड नसणारा पत्रकार असल्याची जळजळीत टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केरळमधील खासदार एम. बी. राजेश यांनी केली आहे. रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीवर झालेल्या वादळी चर्चेनंतर राजेश यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून अर्णब यांच्यावर निशाणा साधला आहे. अर्णब यांची एखाद्या विषयावर आक्रमकपणे व्यक्त होण्याची पद्धत असभ्य असल्याचे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. एक सूत्रसंचालक म्हणून अर्णब यांची सचोटी, आत्मविश्वास आणि विश्वासार्हतेवर त्यांनी शंकाही उपस्थित केली आहे.

भाषणबाजीला आवर घाला; दिल्ली हायकोर्टाचे अर्णब गोस्वामींना आदेश

२६ मे रोजी रिपब्लिक टीव्हीवर झालेल्या चर्चेत राजेश सहभागी झाले होते. मला अगदी शेवटच्या क्षणी या चर्चेत सहभागी होण्यासाठी विचारणा झाली होती. मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या कारभारावर ही चर्चा होईल, असे मला सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष चर्चेला सुरूवात झाली, तेव्हा या चर्चेचा रोख पूर्णपणे बदलला. मला अचानकपणे कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कोडियेरी बालकृष्णन यांनी भारतीय सैन्यासंदर्भात केलेल्या विधानाविषयी प्रश्न विचारण्यास सुरूवात झाली. मी तेव्हाच ही चर्चा सोडून जाऊ शकलो असतो; मात्र मी तसे केले असते, तर मी चर्चेतून पळ काढला, असे अर्णब गोस्वामी यांनी ओरडून सांगितले असते. त्यामुळे मी चर्चेत थांबून बालकृष्णन यांच्याबद्दल चालवल्या जात असलेल्या खोट्या बातमीविषयी पक्षाची भूमिका मांडण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले. बालकृष्णन यांचे वक्तव्य सैन्यविरोधी नसून त्यांनी अफ्स्पा कायद्याच्या गैरवापरावर टीका केली होती. मी बाजू मांडत असताना अर्णब वारंवार ओरडत होते आणि माझ्या बोलण्यात अडथळे आणत होते. अर्णब यांच्याकडून करण्यात येणाऱ्या खालच्या दर्जाच्या आणि आक्षेपार्ह विधानांवरुन त्यांचे इतिहासाचे ज्ञान एखाद्या शाळकरी मुलापेक्षाही कमी असल्याचे दिसून येते. तुमचे अज्ञान पाहून तुम्हाला शिकवणाऱ्या शिक्षकांनाही खजिल वाटत असेल, अशी टीका राजेश यांनी केली.

माझे वडीलही सैन्यात होते. त्यामुळे माझे बालपण तशाचप्रकारच्या वातावरणात गेले आहे. त्यामुळे सैन्यातील जवानांच्या कुटुंबियांना कराव्या लागणाऱ्या त्यागाचा मला अनुभव आहे. मात्र, अर्णब यांनी केवळ टीआरपी वाढवण्यासाठी दांभिकता आणि नाटकी हावभाव करण्यापलीकडे सैन्यासाठी प्रत्यक्षात काय केले आहे?, असा सवालही राजेश यांनी उपस्थित केला.