स्त्री-पुरुष यांच्यातील समानतेची संकल्पना ही इस्लामविरोधी असल्याचे सांगत स्त्रिया या केवळ मुले जन्माला घालण्यासाठीच असतात, त्यांची पुरुषांशी बरोबरी कधीच होऊ शकत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य सुन्नी नेते कांथापूरम ए. बी. अबूबकर मुस्लीअर यांनी कोझिकोडे येथे मुस्लीम स्टुडंट्स फेडरेशनच्या शिबिरात बोलताना केले. लैंगिक समानतेची संकल्पना गैर-इस्लामी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
‘ऑल इंडिया सुन्नी जमीयतुल उलेमा’ या संघटनेचे मुस्लीयर हे प्रमुख आहेत. ते म्हणाले की,  जेंडर इक्विलिटी (लैंगिक समानता) कधीही वास्तवामध्ये साध्य होऊ शकत नाही. पुढे ते असेही म्हटले की, महिला पुरुषांची बरोबरी तसेच संकटाचा सामना करू शकत नाहीत. महिलांमध्ये बौद्धिक क्षमता आणि जगाला नियंत्रणात ठेवण्याशी ताकद नसते, कारण ही ताकद पुरुषांकडे आहे. यावेळी त्यांनी एक प्रश्नही उपस्थित केला की, जगभरातील हजारो हार्ट सर्जनमध्ये एक तरी महिला आहे का?
७६ वर्षीय मुस्लीआर हे इस्लामचे अभ्यासक असून अलीकडेच त्यांनी निवडणुकांमधील महिलांच्या आरक्षणाविरोधातही वक्तव्य केले होते. नागरी निवडणुकामध्ये ५० टक्के राखीव जागा महिलांसाठी देणे ही खूपच मोठी संख्या असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्यानंतर वाद उसळल्यानंतर त्यांनी घूमजाव केले होते.