केरळमध्ये भटक्या कुत्र्यांवरुन सुरु झालेल्या राजकारणाने आता क्रूरपणाचा कळस गाठला आहे. भटक्या कुत्र्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी भटक्या कुत्र्यांची हत्या करुन आंदोलन केल्याची संतापजनक घटना घडली आहे.
सोमवारी केरळमधील कोट्टायम येथे काँग्रेसच्या युवा मोर्चाचे नेते साजी मंजकदम्बिल भटक्या कुत्र्यांविरोधात आंदोलन केले. या आंदोलनात १० भटक्या कुत्र्यांना अमानूष मारहाण करुन त्यांना ठार मारण्यात आले. यानंतर त्या कुत्र्यांचे मृतदेह खांबाला बांधून धिंड काढण्यात आली. हे सर्व कुत्रे नागरिकांच्या दृष्टीने धोकादायक होते असा दावाही आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या सर्व कुत्र्यांचे मृतदेह शेवटी पोस्ट ऑफीसला नेण्यात आले आणि हे मृतदेह दिल्लीत मेनका गांधी यांच्या कार्यालयात पाठवावे अशी मागणीही या आंदोलकांनी केली.
काँग्रेसच्या युवा मोर्चाने केलेल्या आंदोलनाचे छायाचित्र समोर येताच प्राणीमित्रांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणी कोट्टायम पोलिसांनी साजी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर प्राण्यांची क्रूरतेने हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
केरळमध्ये भटक्या कुत्र्यांवरुन सध्या राजकारण सुरु आहे. काही दिवसांपूर्वी केरळमधील कोची येथे एका पंचायतीने भटक्या कुत्र्यांच्या समस्येला कंटाळून २० कुत्र्यांची हत्या केली होती. तर केरळ सरकारनेही भटक्या कुत्र्यांची हत्या करण्याचा निर्णय घेतला होता. या घटनेचा केंद्रीय मंत्री मेनका गांधी या निषेध केला होता. भटक्या कुत्र्यांना मारणे हे या समस्येवरचा उतारा नाही असे मेनका गांधी यांनी म्हटले होते. केरळमध्ये या वर्षात मेपर्यंत श्वान दंशाच्या ३१ हजार घटना घडल्या होत्या. तर २०१५ मध्ये श्वानदंशाच्या तब्बल १ लाख २२ हजार घटना घडल्या होत्या. भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.