ख्यातनाम पत्रकार व लेखक खुशवंत सिंग यांनी त्यांच्या ९८व्या वाढदिवशी ‘खुशवंतनामा’ हे नवीन पुस्तक सादर केले आहे. त्याची पहिली प्रत पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पत्नी गुरशरण कौर यांना प्रदान करण्यात आली. पेंग्विन बुक्स इंडियाने प्रकाशित केलेले हे पुस्तक खुशवंत सिंग यांनी गुरुशरण कौर यांना अर्पण केले आहे. पुढील आठवडय़ात ते बाजारात येत आहे.
खुशवंत सिंग यांचा वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी अत्यंत खासगी समारंभात साजरा झाला त्या वेळी या पुस्तकाची प्रत श्रीमती कौर यांना सादर करण्यात आली.
‘खुशवंतनामा – द लेसन्स ऑफ माय लाइफ’ असे या पुस्तकाचे नाव असून, त्यात त्यांनी निवृत्तीनंतरचे आयुष्य आनंदी व आरोग्यपूर्ण कसे जगावे याविषयी काही मते मांडली आहेत. भारतातील राजकारण, राजकारणी व देशाचे भवितव्य, धर्म म्हणजे काय यावरही भाष्य केले आहे.
ट्रेन टू पाकिस्तान, आय शाल नॉट हिअर नाइटिंगेल, दिल्ली ही त्यांची पुस्तके गाजली. वयाच्या ९५व्या वर्षी त्यांनी द सनसेट क्लब ही कादंबरी लिहिली. अ हिस्टरी ऑफ सीख्स हे त्यांचे पुस्तक शीख धर्म व संस्कृतीवर आधारित आहे. ट्रथ, लव्ह अँड लिटल मलाइस हे त्यांचे आत्मचरित्र २००२ मध्ये प्रसिद्ध झाले.