जगातील ऑनलाईन पायरसी संकेतस्थळ असलेल्या किकअ‍ॅस टॉरंटच्या प्रमुखास ताब्यात देण्याची मागणी अमेरिकेने केली आहे. त्याच्या या संकेतस्थळावरून १ अब्ज डॉलर्सचे चित्रपट, संगीत व इतर आशयाची नक्कल झाली आहे. अमेरिकेच्या न्याय खात्याने पोलंडमध्ये अटक केलेला युक्रेनचा नागरिक अर्टेम वॉवलिन  (वय ३०) याच्या विरोधात गुन्हेगारी खटला दाखल केल्याचे सांगितले. अमेरिकी अधिकाऱ्यांना तो स्वामित्व हक्क भंग प्रकरणात हवा आहे. त्याने काळ्या पैशाचे व्यवहारही केले होते. वॉवलिन याने किकअ‍ॅस टॉरंट हे संकेतस्थळ चालवले होते व त्याने गेल्या काही वर्षांत पायरेट बे या दुसऱ्या अशाच्या संकेतस्थळाला मागे टाकले होते. अमेरिकी दूतावासाचे वॉर्सातील प्रवक्ते स्टीफन ड्रेकॉर्न यांनी सांगितले की, अर्टेम वॉवलिन याचा ताबा अमेरिकेने मागितला आहे. अमेरिकेच्या गुन्हेगारी खटल्याच्या संदर्भात असे सांगण्यात आले की, स्वामित्व हक्क असलेले अनेक चित्रपट व संगीत किकअ‍ॅसवरून डाऊनलोड केले जात होते. व्हिडिओ गेम्स व टीव्ही कार्यक्रमही त्यावरून डाऊनलोड करता येत होते. इंटरनेटवरील ते सर्वात जास्त लोक भेट देणाऱ्यात ६९ वे संकेतस्थळ होते. वॉवलिन याच्यावर बेकायदेशीररीत्या विविध आकृतिबंधातील आशय उपलब्ध करून दिल्याचा आरोप असून त्याने स्वामित्व हक्क असलेला १ अब्ज डॉलर्सचा आशय बेकायदेशीररीत्या वितरित केला आहे. कायदा अंमलबजावणी संस्थांना चुकवण्यासाठी वॉवलिन हा जगातील विविध देशांच्या सव्‍‌र्हर्सवर अवलंबून होता. त्याला अखेर पोलंडमध्ये वॉर्सातील चॉपिन विमानतळावर अटक करण्यात आली असे सीमा सुरक्षा दलाच्या प्रवक्त्या अग्नीझका गोलियास यांनी सांगितले. अमेरिकी अधिकाऱ्यांनी सांगितले की, शिकागो येथे त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले असून एक बँक खाते गोठवण्याचे आदेश दिले आहे.