बसप नेते मुनव्वर हसन आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयाच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बंटीच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुराडी येथील मुनव्वर यांच्या समवेत ६ जणांची सुनियोजित पद्धतीने हत्या करण्याची कल्पना बंटीला दृश्यम चित्रपट पाहिल्यानंतर सुचली. चित्रपटात दाखवल्याप्रमाणे त्याने या ६ जणांची हत्या केली. पुरावे नष्ट करण्यासाठी आणि स्वत:ला पोलिसांपासून वाचवण्यासाठी त्याने चित्रपटांतील सर्व पद्धती आजमावल्या होत्या.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बंटीने दृश्यम चित्रपट तब्बल ५ वेळा पाहिला होता. पहिल्यांदा त्याने मल्टिप्लेक्समध्ये हा चित्रपट पाहिला होता. तेव्हापासून तो चित्रपटातील सर्व दृश्ये आणि त्यात वापरण्यात आलेल्या पद्धती याचाच तो सातत्याने विचार करत होता. त्यानंतर त्याने टीव्हीवर अनेकवेळा दृश्यम पाहिला. बंटीने चित्रपटात ज्या पद्धतीने खुनाचे पुरावे नष्ट करण्याच्या नव्या पद्धती दाखवण्यात आल्या. त्या प्रमाणेच त्याने बनाव रचला होता.

बंटीने चित्रपटाच्या धर्तीवरच नियोजनबद्धरित्या हे खून केले. सर्वात प्रथम पोलीस आपले मोबाइल लोकेशन शोधतील याचीही बंटीला कल्पना होती. त्यामुळेच त्याने मेरठमध्ये त्याने इशरत आणि त्यांच्या दोन्ही मुली आरजू आणि आर्शीच्या हत्येदरम्यान स्वत:कडे मोबाइल ठेवला नव्हता. इतकंच काय त्याने भाडोत्री मारेकऱ्यांनाही मोबाइल जवळ ठेऊ दिला नव्हता. मुनव्वर कुटुंबीयांचा हितचिंतक आणि निकटचा असल्याने आपल्यावर कोणी शंका घेणार नाही, अशी त्याला खात्री होती.