मलेशियातील चौकशीचा निष्कर्ष

उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांचे सावत्र भाऊ किम जोंग नाम यांचा खून व्हीएक्स नव्‍‌र्ह रसायन वापरून करण्यात आला, असे मलेशियाच्या पोलिसांनी म्हटले आहे. व्हीएक्स नव्‍‌र्ह रसायन हे सामूहिक विनाशास कारण ठरते व ते रासायनिक युद्धात वापरले जात असते. किम जोंग नाम यांच्या शवविच्छेदनानंतर प्राथमिक अहवालात असे म्हटले आहे, की खून करणाऱ्यांनी वासहीन, चवहीन व अतिशय विषारी असे व्हीएक्स नव्‍‌र्ह रसायन यात वापरले होते. उत्तर कोरियात रासायनिक शस्त्रांचे भरपूर साठे आहेत. त्यात व्हीएक्स नव्‍‌र्ह रसायनाचा समावेश आहे. एकूण ५००० टन रासायनिक अस्त्रे त्यांच्याकडे आहेत, असे दक्षिण कोरियाच्या तज्ज्ञांचे मत आहे.

व्हीएक्सचे अवशेष नाम यांचा चेहरा व डोळ्यावर आढळून आळे. १३ फेब्रुवारीला सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यात आले होते, त्यात दोन महिला किम यांच्या जवळ येताना दिसत असून त्यांनी नाम यांच्या चेहऱ्यावर काहीतरी टाकले. व्हीएक्स नव्‍‌र्हचे दोन थेंबही चेतासंस्था निकामी करण्यास कारण ठरतात. यातील दोन्ही महिला आता तुरुंगात असून त्यांच्यापैकी एक आजारी पडली आहे, शुक्रवारी तिने उलटी केली, असे पोलिसांनी सांगितले. राष्ट्रीय पोलिस प्रमुख खालीद अबू बकर यांनी सांगितले, की या महिला जेथे गेल्या तिथे व विमानतळावर अणुऊर्जा तज्ज्ञांनी पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. व्हीएक्स रसायन कुठून आणले याचा शोध गुप्तहेर घेत आहेत. जर या रसायनाचे प्रमाण कमी असेल तर ते कुठून व कसे आणले हे कळणे अवघड आहे. डिप्लोमॅटिक पाउचमधून व्हीएक्स रसायन मलेशियात आणणे कठीण नाही, असे प्रादेशिक सुरक्षा तज्ज्ञांनी सांगितले. सिंगापूर येथील राजकीय हिंसा व दहशतवाद संशोधन केंद्राचे रोहन गुणरत्ना यांच्या मते पाउचमधून बंदी घातलेली रसायन उत्तर कोरियातून मलेशियात आणणे अवघड नाही. हल्ला करणाऱ्या महिलेला आपण टीव्ही शो मधील गंमतजंमत करीत आहोत, असे वाटले होते हा दावा खालीद यांनी मागे घेतला असून तिला ती विषारी रसायनाच्या मदतीने हल्ला करीत असल्याचे माहिती होते असे म्हटले आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार किम यांनी हल्ल्यानंतर विमानतळ कर्मचाऱ्यांकडे मदत मागितली होती व त्यांनी त्यांना रुग्णालयात नेले. त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.