रिओ ऑलिम्पिकमध्ये उत्तर कोरियातील खेळाडूंच्या कामगिरीवर देशाचा हुकूमशहा किम जाँग ऊन चांगलाच संतापला आहे. ऑलिम्पिकमध्ये देशासाठी मेडल आणू न शकणा-या खेळाडूंना किम जाँग ऊन चक्क कोळसा खाणीत काम करायला लावणार आहे.
रिओ ऑलिम्पिकसाठी उत्तर कोरियाचे ३१ जणांचे पथक रवाना झाले होते. या पथकाकडून किम जाँग ऊनने अवास्तवी अपेक्षा ठेवल्या होत्या. देशाला ५ सुवर्णसह १७ मेडल्स मिळतील, अशी आशा किम जाँगने ठेवली होती. मात्र प्रत्यक्षात खेळाडूंना फक्त ७ मेडल्सच जिंकता आले. यामुळे किम जाँग ऊन मात्र भलताच संतापला आहे. खेळात जयपराजय होत असला तरी किम जाँग ऊनला पराभव कदापि सहन होत नाही हे यापूर्वीही दिसून आलंय. २०१० मध्ये पोर्तुगालविरुद्धच्या फुटबॉल सामन्यात पराभव झाल्यानंतर संघातील खेळाडूंना लाईव्ह टीव्हीवरच शिक्षा देण्यात आली होती. या खेळाडूंनाही कोळसा खाणीत काम करायला पाठवण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर किम जाँग ऑलिम्पिकमध्ये निराशाजनक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही कोळसा खाणीतच पाठवेल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. या खेळाडूंना मिळणाऱ्या सोयी सुविधाही परत घेतल्या जातील, असा अंदाज व्यक्त केला जातोय.
दरम्यान, ऑलिम्पिकमध्ये उत्तर कोरियाची महिला जिम्नॅस्ट हाँग यूने दक्षिण कोरियाच्या महिला जिम्नॅस्टसोबत सेल्फी काढला होता. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियातील कट्टर वैमनस्य बघता ही सेल्फी चर्चेचा विषय ठरली होती. किम जाँगला ही सेल्फीदेखील फारशी भावलेली नाही. सेल्फी काढणा-या हाँग यूनला किम जाँग मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावेल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. निराशाजनक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर किम जाँग ऊन नाराज असला तरी देशासाठी मेडल जिंकणा-या खेळाडूंवर मात्र किम जाँग यांची कृपादृष्टी बरसणार आहे. आता किम जाँग ऊन काय शिक्षा देतो याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.