ठाकुर्लीजवळ पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आल्याची टीका भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. खा. सोमय्या वा गोपाळ शेट्टी यांनी रेल्वे मंडळाच्या अधिकाऱ्यांची रेल्वे मंत्रालयात भेट घेत त्यांच्याकडे तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली. रेल्वेचा हा सावळा गोंधळ नित्याचाच असल्याने आता खुद्द रेल्वे मंडळाच्या अध्यक्षांनीच यात लक्ष घालावे, अशी मागणी खा. सोमय्या यांनी केली. रेल्वे मंडळाचे अध्यक्ष ए. के. मित्तल यांच्याशी मुंबईमध्ये रेल्वेच्या समस्यांविषयी चर्चा केल्याचे सोमय्या म्हणाले.
सोमय्या यांनी सांगितले की, पेंटाग्राफ तुटणे हे नित्याचेच झाले आहे. एसी-डीसी परिवर्तनाचे (कन्व्हर्जन) काम रखडल्याने पेंटाग्राफ तुटतो. त्यामुळे एसी-डीसी परिवर्तनाचे काम युद्धपातळीवर करण्यात यावे, अशी मागणी रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.