ईस्ट इंडिया कंपनीने कोहिनूर हिरा चोरलेला नव्हता, तर राजा दिलीप सिंह यांनी तो इंग्रजांना भेट म्हणून दिला होता, असे केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. इंग्लंडमध्ये असलेल्या कोहिनूर हिऱ्यावर भारत दावा करू शकत नसल्याने तो भारतात आणणे शक्‍य नाही. सन १८४९मध्ये झालेल्या युद्धात पराभव झाल्याने दिलीप सिंह यांनी हा हिरा इंग्रजांना दिला होता. कोहिनूर आपण परत मागितला तर आपल्या संग्राहलयामध्ये असलेल्या वस्तूंवरही दुसरे देश दावा करू शकतील, अशी माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली. कोहिनूर हिरा भारतात परत आणण्यासाठी एका स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान सरकारने ही माहिती दिली.
टिपू सुलतान यांची तलवार परत आणली आहे. हिऱ्याच्या बाबतीतही असे होऊ शकते. परंतु, याचिका रद्द व्हावी अशी तुमची इच्छा आहे का? असे झाल्यास भविष्यात कायदेशीर हक्क सिद्ध करणे तुम्हाला अवघड होईल, असे मत सरन्यायाधीशांनी मांडले. कोहिनूर हिरा भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकार कोणते प्रयत्न करीत आहे, याची माहिती देण्यासाठी न्यायालयाने सरकारला सहा आठवड्यांची मुदत दिली आहे.