नोकरीच्या शोधात मुंबईत आल्यानंतर भाजी विक्रेता ते मुंबई काँग्रेसचा ‘चेहरा’ असा नाट्यमय राजकीय प्रवास राहिलेल्या कृपाशंकर सिंह यांचे भविष्य बेहिशेबी मालमत्ता प्रकरणामुळे अंधारात सापडण्याची शक्यता आहे. कृपाशंकर आणि त्यांच्या कुटुंबियांनी ९५.०३ कोटींची संपत्ती जमवली असून यातील १८.९६ कोटींची मालमत्ता बेहिशेबी असल्याचा दावा मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने कृपाशंकर यांच्या विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रात केला आहे. यामध्ये त्यांच्या बेनामी सदनिका, गाड्या, बॉलीवूड कलाकार आणि बड्या व्यक्तींना दिलेली कर्जे यांचा उल्लेख करण्यात आला असून हा एकूण तब्बल ३२० कोटींचा घोटाळा असल्याचेही आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
बेहिशेबी मालमत्ता प्रकरण: कृपाशंकर यांचा कर्जात बुडाल्याचा दावा
मूळचे जौनपूर गावाच्या कृपाशंकर यांनी १९७१ साली बारावीत नापास झाल्यामुळे नोकरीच्या शोधात मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या खार येथील रामभरोसे चाळीत आपला भाऊ शिवशंकर याच्यासोबत राहणाऱया कृपाशंकर यांनी सुरूवातीला एका डेरीमध्ये काम करण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर भाजी विक्रेत्याचाही धंदा काही वर्षे केला. एका औषधनिर्मिती कंपनीत पॅकर म्हणून मिळालेल्या नोकरीने कृपाशंकर यांची आर्थिक परिस्थिती स्थिरस्थावर होण्यास सुरूवात झाली. याच काळात काँग्रेसच्या सेवा दलात कृपाशंकर सक्रिय झाले आणि पुढे मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस देखील झाले. आरोपपत्रात नमूद करण्यात आलेल्या आरोपानुसार या दरम्यान जौनपूर येथील आपल्या शेतीतून मिळणारे उत्पन्न हेच आपल्या मिळकतीचा मार्ग असल्याचे कृपाशंकर यांनी दाखविले होते.
१९८८ साली कृपाशंकर सिंह माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पुत्र राजेंद्र शेखावत यांच्यासोबत नवी मुंबईतील साईनाथ मोटर्स कंपनीचे भागीदार झाले. यामध्ये कोणत्याही भांडवलाची गुंतवणू न करता कृपाशंकर यांना कंपनीचे भागीदार करून घेतल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच या कंपनीतील आपल्या भूमिकेबद्दल समाधानकारक स्पष्टीकरण देण्यातही अपयशी ठरल्याचेही आरोपपत्रात म्हटले आहे.