ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेल्या भारतीय वंशाच्या समाजासाठी गेली अनेक दशके कार्य करीत असलेल्या तसेच ऑस्ट्रेलियन व भारतीय संस्कृतींत समन्वयाचे कार्य करीत असलेल्या कृष्णा अरोरा यांना ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया मेडल’ हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
आन्टीजी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अरोरा या पाकसिद्धीबाबतच्या शंकांना उत्तरे देण्यासाठी दूरध्वनीसंपर्कसेवाही चालवतात. तसेच ऑस्ट्रेलियन गृहिणींना भारतीय पाककृती शिकविण्याचे त्यांचे वर्गही लोकप्रिय आहेत. ऑस्ट्रेलियात नव्याने आलेल्या भारतीयांना तेथील चालीरिती, सामाजिक नियम यांची माहिती देण्याची मोफत सेवाही आन्टीजी पुरवितात.
गेल्या नोव्हेंबरमध्ये क्रिकेटपटु सचिन तेंडुलकर याचाही या पुरस्काराने गौरव झाला होता. याआधी जॉयस वेस्ट्रिप (२०००), माला मेहता (२००६) आणि वेट्टा राजकुमार (२००९) या भारतीय वंशाच्या महिलांचाही या पुरस्काराने गौरव झाला आहे.