कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि गृहमंत्री के. जे. जॉर्ज यांच्या मुलींवर बलात्कार झाला तरच त्यांना लैंगिक हल्ला पीडितांच्या समस्या काय असतात त्याची जाणीव होईल, असे वादग्रस्त वक्तव्य कर्नाटकमधील भाजपचे ज्येष्ठ नेते के. एस. ईश्वरप्पा यांनी केले आहे.
कर्नाटकमध्ये लैंगिक हल्ल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून सिद्धरामय्या यांनी त्याचा निषेध नोंदविल्यानंतर ईश्वरप्पा यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. मात्र कर्नाटक भाजपने या प्रकरणी हात झटकले आहेत.
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईश्वरप्पा यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. ईश्वरप्पा यांच्या बंगळुरू आणि शिवमोगा येथील निवासस्थानांबाहेर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. तेव्हा त्यांना पोलिसांनी हुसकावून लावले.
या विधानावरून राज्यभर मोठा गहजब झाला तेव्हा मीडिया टीआरपीसाठी हे प्रकार करीत आहे, अशी आणि असे वक्तव्य का करण्यात आले ते तपासून पाहण्यात येईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. त्यामुळेच आपण वरील वक्तव्य केले, असे ईश्वरप्पा म्हणाले.
सिद्धरामय्या आणि जॉर्ज यांच्या मुली आपल्या भगिनींसारख्या आहेत, आपल्यालाही बहीण आहे, त्यांच्यावर बलात्कार व्हावा अशी आपली इच्छा नाही, पण त्यांच्या मुलींवर बलात्कार झाला तरच त्यांना त्यामागील भीषणतेची कल्पना येईल, हा असे वक्तव्य करण्यामागील उद्देश होता, असेही ईश्वरप्पा म्हणाले.
जे सुसंस्कृत आहेत ते अशा प्रकारची वक्तव्य करणार नाहीत, असे स्पष्ट करून सिद्धरामय्या यांनी हे विधान हीन असल्याचे सांगितले. तर ईश्वरप्पा यांनी अशी विधाने करू नयेत, असा सल्ला त्यांना देण्यात येईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष प्रल्हाद जोशी म्हणाले.