भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना फाशी देण्याची पाकिस्तान सरकारला घाई झाल्याचं दिसतं. जाधव प्रकरणाची जलद सुनावणी घेण्यात यावी, अशी विनंती पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडं (International Court of Justice) केल्याचं समजतं. न्यायालयीन सुनावणी पूर्ण होईपर्यंत जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाणार नाही, असं पाकिस्ताननं स्पष्ट केलं आहे. ही बाब भारतासाठी दिलासादायक असल्याचं मानलं जातं.

‘द एक्स्प्रेस ट्रिब्युन’च्या सूत्रांनुसार, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या रजिस्ट्रारशी पत्रव्यवहार केला आहे. त्यात जाधव प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. पुढील काही आठवड्यांतच सुनावणी पूर्ण व्हावी, असा पाकिस्तानचा आग्रह आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांसाठी नोव्हेंबरमध्ये निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्यामुळं जाधव प्रकरणाची सुनावणी ऑक्टोबरमध्ये घेतली जाण्याची शक्यता आहे. या सर्व शक्यता लक्षात घेऊनच पाकिस्ताननं न्यायालयाशी पत्रव्यवहार केला आहे. जाधव प्रकरणाची सुनावणी पुढील सहा आठवड्यांत घेण्यात यावी, अशी विनंती त्यात करण्यात आली आहे.

दरम्यान, पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं हेरगिरीच्या आरोपाखाली भारतीय नागरीक कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेला भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिलं आहे. यावर दोन्ही पक्षांनी आपापली बाजू न्यायालयात मांडली होती. जाधव यांच्यावरील हेरगिरीचे आरोप अजून सिद्ध झाले नाहीत. त्यामुळं अंतिम निर्णय येईपर्यंत जाधव यांना फाशी देता येणार नाही, असा निर्णय न्यायालयानं दिला होता. आदेशांचे पालन न केल्यास पाकिस्तानवर कारवाई करण्यात येईल, असंही आदेशात म्हटलं होतं. त्यावर पाकिस्तानचा जळफलाट झाला होता. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय अमान्य असल्याचं पाकिस्ताननं म्हटलं होतं. त्यानंतर जाधव यांच्याबाबत कोणतीच अधिकृत प्रतिक्रिया पाकिस्तानकडून देण्यात आली नाही. मात्र, पाकिस्तानचे उच्चायुक्त बासित यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत जाधव यांच्या शिक्षेवर अंमलबजावणी केली जाणार नाही, असं म्हटलं होतं.