भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी लष्कराने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिल्याने पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. भारताला जगासमोर उघडे पाडू, असा राग पाकिस्तानने आळवला आहे. भारताने कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानला ठोस उत्तर दिलेले नाही, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

दुसरीकडे पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयानेही ट्विट करून आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय अमान्य असल्याचे अप्रत्यक्षपणे म्हटले आहे. कोणत्याही देशाच्या न्यायालयाद्वारा दिलेला निर्णय बदलण्याचा अधिकार जगातील कोणत्याही न्यायालयाला नाही, असे संरक्षण मंत्रालयाने ट्विटमध्ये म्हटले आहे. आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहोत, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय अमान्य असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. दोन्ही देशांमध्ये कॉन्स्युलर अॅक्सेससंबंधी करार आहे. जाधव यांच्याशी संबंधित भारतातील सहायकांपर्यंत पोहोचण्याची मागणी पाकिस्तानने केली होती. पण भारताने त्यास सहमती दर्शवली नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. राष्ट्रहितासाठी या प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेला निर्णय अमान्य आहे, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे.