कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयात ठोस पुरावे देणार असा दावा पाकिस्तानचे अॅटर्नी जनरल अशतर औसाफ अली यांनी केला आहे. जाधवविरोधात महत्त्वाची माहिती आमच्या हाती लागल्याचे अशतर यांनी म्हटले आहे.

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. हेरगिरी आणि घातपाती कारवायांच्या आरोपाखाली त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली होती. याविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने १८ मे रोजी पाकिस्तानला झटका देत अंतिम निर्णय येईपर्यंत जाधव यांना फाशी देऊ नये असे म्हटले होते.
पाकिस्तानमधील अॅटर्नी जनरल अशतर औसाफ अली यांनी जाधव प्रकरणावर भाष्य केले. जाधवविरोधात आमच्याकडे महत्त्वाची माहिती आहे असे अली यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. पाकिस्तानचा दावा अद्याप आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फेटाळलेला नाही. न्यायालयाने फाशीच्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. या निर्णयाकडे पाकिस्तानचा पराभव आणि भारताचा विजय या दृष्टीने बघू नये असे त्यांनी सांगितले.

पाकिस्तान हा एक जबाबदार देश आहे, आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करतानाच देशाच्या सुरक्षेशी तडजोड करणार नाही असे औसाफ यांनी सांगितले. जाधव यांना फाशीची शिक्षा देण्याच्या निर्णयाचेही त्यांनी समर्थन केले आहे. जाधव यांनी इराणमधून बलुचिस्तान प्रांतात प्रवेश केल्यानंतर सुरक्षा दलांनी गेल्या वर्षी ३ मे रोजी त्यांना अटक केल्याचा दावा पाकने केला आहे. मात्र, जाधव हे व्यापारानिमित्त इराणला गेले असताना त्यांचे तेथून अपहरण करण्यात आले असे भारताने म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयात झालेल्या सुनावणीत पाकिस्तानने जाधव यांची ध्वनिफीत प्रदर्शित करण्याची परवानगी मागितली होती. आपण भारतासाठी हेरगिरी करीत होतो, अशी कबुली जाधव यांनी दिल्याचे त्या चित्रफीतीत दिसत होते. पण न्यायालयाने ही चित्रफीत लावण्यास नकार दिला होता. त्यापार्श्वभूमीवर आता पाकिस्तान कोणता पुरावा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.