कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेवर भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांची सूचना

पाकिस्तानने भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना फाशी दिल्यास भारताने बलुचिस्तानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्यावी, अशी सूचना भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.

पाकिस्तानने जाधव यांना फासावर चढवले, तर बलुचिस्तानला मान्यता देऊन भारताने त्यांना धडा शिकवावा. इतकेच नव्हे, तर त्याला अद्दल घडवण्यासाठी सीमेपलीकडील दहशतवादाला प्रोत्साहन देऊन भारताचे बलुचिस्तान, पख्तुनिस्तान व सिंध असे तुकडे करावेत, असेही स्वामी म्हणाले.

भारत विकास परिषद या स्वयंसेवी संस्थेने रविवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘भारत व आंतरराष्ट्रीय दहशतवाद’ या विषयावर स्वामी व्याख्यान देत होते.

पाकिस्तानला केवळ दहशतवादाला प्रोत्साहन देणारा देश घोषित करण्याने काहीच साध्य होणार नाही. पाकिस्तानचे तुकडे करूनच सीमेपलीकडील दहशतवादाचा मुद्दा अधिक चांगल्या रीतीने हाताळता येईल, असे मत स्वामींनी व्यक्त केले. भारतासाठी ‘मोस्ट वाँटेड’ असलेल्या हफीझ सईद व दाऊद इब्राहिम या दोन दहशतवाद्यांच्या राहण्याच्या ठिकाणावर भारताने हल्ले करावेत, असेही त्यांनी सुचवले. पाकिस्तानच्या भूमीवर जन्माला येणाऱ्या दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा पाठिंबा मागावा, अशीही सूचना स्वामी यांनी केली.

सीमेवर अशांत परिस्थिती उद्भवल्यास अणुबाँब वापरण्याच्या पाकिस्तानच्या धमकीची भारताने पर्वा करू नये, कारण या बाँबची कळ अमेरिकेच्या हाती आहे आणि त्याचे पाकिस्तानच्या व्यवहारांवर पूर्ण नियंत्रण आहे, असेही स्वामी यांनी आवर्जून सांगितले.