फाशी रद्द करण्याची मागणी; पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांना विचारणा

भारतीय नागरिक व माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांची फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी त्यांच्या आईने पाकिस्तानी न्यायालयात धाव घेतली आहे. यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्त गौतम बंबवाले यांनी बुधवारी पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांची भेट घेऊन जाधव यांच्याबाबतच्या विविध मागण्यांसाठी अपील केले होते. मात्र ही मागणी पाकिस्तानकडून फेटाळून लावण्यात आली आहे. जाधव यांना भेटण्यास परवानगी देण्यात यावी तसेच पाकिस्तान सरकारने यामध्ये हस्तक्षेप करत ही फाशी रद्द करावी, अशी मागणी जाधव यांच्या आईने केली आहे.

कुलभूषण जाधव यांच्यासोबत संपर्क साधता यावा, यासाठी भारताकडून १६ व्यांदा कौन्सुलर अ‍ॅक्सेससाठी अपील करण्यात आले आहे. जाधव यांच्या बचावासाठी एक वकील पुरवण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

जाधव यांना सुनावण्यात आलेली शिक्षा रद्द करावी आणि भेटण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करत जाधव यांच्या आईने न्यायालयात याचिका दाखल केली आहे, असे बंबवाले यांनी सांगितले. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपाखाली जाधव यांना अटक केली आहे.

दूतावासाशी संपर्क साधू देण्याची भारताची मागणी

जाधव यांच्याशी दूतावास संपर्क साधू द्यावा, अशी मागणी भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानकडे केली आहे.  भारताचे पाकिस्तानातील उच्चायुक्त गौतम बंबवाले यांनी परराष्ट्र सचिव तेहमिमा जानजुआ यांची भेट घेतली व त्यांच्याकडे जाधव यांच्याशी संपर्क साधू देण्याची मागणी केली. १९ एप्रिलला जानजुआ यांच्याशी बंबवाले यांची भेट होणार होती पण काही कारणाने ती लांबणीवर पडली होती.

पाकिस्तानने भारताला जाधव यांच्याशी दूतावासामार्फत संपर्क साधू  देण्यास नकार दिला आहे. पाकिस्तानी लष्कराने फाशीची शिक्षा देण्यात आलेल्या जाधव यांच्याशी भारताला दूतावास संपर्क साधू दिला जाणार नाही अशीच भूमिका घेऊन मागणी फेटाळली आहे.

जाधव  यांना लष्करी न्यायालयाने याच महिन्यात फाशीची शिक्षा सुनावली असून त्याच्या तीव्र प्रतिक्रिया भारतात उमटल्या आहेत. जाधव यांना फाशी दिल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा भारताने दिला असून तसे झाल्यास तो पूर्वनियोजित खून ठरेल असे म्हटले आहे. पाकिस्तानी लष्कराने जाधव यांच्या अटकेनंतर त्यांच्या कबुलीजबाबाची ध्वनिचित्रफीत प्रसारित केली आहे. भारताने पाकिस्तानचे दावे फेटाळले असून पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी जाधव यांचे इराणमधून अपहरण करून त्यांना हेरगिरीच्या प्रकरणात गुंतवले असे म्हटले आहे.