भारतीय लष्कराने दहशतवाद्यांची घुसखोरी सुरु असलेल्या नौशेरातील पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत. या कारवाईचा व्हिडिओदेखील भारतीय लष्कराने प्रसिद्ध केला आहे. रजौरीतील नौशेरा सेक्टरमध्ये ९ आणि १० मे रोजी आक्रमक होत भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या. यावेळी भारतीय लष्कराकडून पाकिस्तानच्या चौक्यांवर ११ तोफगोळे डागण्यात आले.

सीमेपलीकडे असणाऱ्या ज्या चौक्यांचा वापर दहशतवाद्यांकडून घुसखोरीसाठी करण्यात येता, त्याच चौक्यांना लक्ष्य करण्यात आल्याचे भारतीय लष्कराने सांगितले. दहशतवादी कारवाया आणि दहशतवाद्यांची घुसखोरी सहन केली जाणार नाही, हा स्पष्ट संदेश देण्यासाठी कारवाई करण्यात आल्याचे लष्कराने म्हटले. भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त केल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध करुनही पाकिस्तानने अशा प्रकारची कारवाई झालीच नसल्याचा दावा केला.

भारतीय सैन्याने केलेल्या आक्रमक कारवाईचे देशभरातून कौतुक होते आहे. सर्जिकल स्ट्राइकनंतरची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे. यावरुन आम आदमी पक्षाचे नेते आणि कवी कुमार विश्वास यांनी ट्विटरवरुन पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. ‘नवाज मियाँ, भारतीय लष्कराकडून नौशेरी वाली गुड नाईट कबूल करा. शरीफ रहा, अन्यथा शरीफा (चिरडले जाल) व्हाल. खोटे वाटत असेल तर तीन युद्ध केलेल्या तुमच्याकडील ज्येष्ठांना विचारा. तसेही तुम्हाला तो कॉल लोकलच असेल,’ अशा शब्दांमध्ये कुमार विश्वास यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची खिल्ली उडवली आहे.

आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनीदेखील नौशेरातील भारतीय लष्कराच्या कारवाईचे कौतुक केले आहे. ‘नौशेरातील कारवाईबद्दल लष्कराला सलाम. देशाला सैनिकांचा अभिमान आहे,’ अशा शब्दांमध्ये केजरीवाल यांनी लष्कराचे कौतुक केले आहे. संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनीदेखील लष्कराच्या कारवाईचे कौतुक केले आहे. ‘सरकार लष्कराच्या कारवाईचे समर्थन करते. जम्मू काश्मीरमधील शांतता प्रस्थापित करण्यासाठी यासारख्या कारवाया आवश्यक आहेत,’ असे जेटली यांनी म्हटले.