लोकसभा निवडणुकांसाठी भोपाळ मतदारसंघाऐवजी गांधीनगर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्याने नाराजी व्यक्त करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी शनिवारी नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष नसून सर्व काही आलबेल असल्याचे दाखवून देण्यासाठी अडवाणींचा उमदेवारी अर्ज दाखल करतेवेळी नरेंद्र मोदी जातीने उपस्थित राहिले असल्याची चर्चा आहे. लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गांधीनगरमध्ये दाखल झाल्यानंतर  या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी आपण उत्साहित असल्याची प्रतिक्रिया यावेळी लालकृष्ण अडवाणींनी दिली. तसेच मला मिळालेल्या पाठिंब्याबद्दल गुजरातची जनता, माध्यमांचा आभारी आहे. गांधीनगरमधून पुन्हा निवडणूक लढविताना आपल्याला आनंद होत असल्याचे अडवाणींनी सांगितले. यावेळी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वगुणांचे कौतुक करताना “मोदी किंवा अन्य कुणाचीही तुलना अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी करणार नाही. वाजपेयींचे नेतृत्व वेगळ्याच दर्जाचे होते. नरेंद्र मोदी हे अत्यंत कुशल संघटक आहेत. पंतप्रधान म्हणून त्यांची कामगिरी चांगली होईल” असा विश्वास लालकृष्ण अडवाणींनी व्यक्त केला.

लखनऊ मतदारसंघातून राजनाथ सिंह यांचा उमेवारी अर्ज दाखल
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी शनिवारी सकाळी लखनऊ लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राजनाथसिंह उत्तर प्रदेशातील लखनऊ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवीत आहेत. या मतदारसंघातून तीनवेळा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी निवडून आलेले आहेत. या ठिकाणाहून यंदा लालजी टंडन यांच्याऐवजी राजनाथसिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी राजनाथ सिंहांनी काँग्रेस पक्षावर टीका करताना, काँग्रेस हा देशातील सर्वांत मोठा जातीयवादी पक्ष असल्याचे सांगितले आहे.