दिल्लीत माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. कारच्या धडकेत जखमी झालेला तरुण १२ तास रस्त्यावरच तडफडत होता. दुर्दैव म्हणजे जखमी अवस्थेत विव्हळत पडलेल्या तरुणाला मदत करण्याऐवजी त्याच्याकडील मोबाईल फोन, कपड्याची बॅग आणि खिशातील १२ रुपयेदेखील चोरण्यात आले. त्यामुळे ‘दिल्ली दिलवालो की आहे का?’ असा प्रश्न उपस्थित होत आहे.

उत्तर प्रदेशमधील बिजनौरचा रहिवासी असलेला नरेंद्र कुमार (वय ३५) हा दिल्लीत चालक म्हणून काम करतो. मंगळवारी संध्याकाळी नरेंद्र कुमार जयपूरहून घरी परतण्यासाठी निघाला. दिल्लीतील काश्मिरी गेट येथे रस्ता ओलांडत असताना भरधाव कारने त्याला धडक दिली. संध्याकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात जखमी झालेला नरेंद्र कुमार रस्त्यालगत पदपथावरच पडून होता. तब्बल १२ तास त्याला कोणीही मदत केली नाही. तो रस्त्यावर जखमी अवस्थेत विव्हळत होता. पण रस्त्यावरुन जाणाऱ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. नरेंद्रच्या यातना इथेच संपत नाही. नरेंद्र कुमारचा मोबाईल फोन, त्याची बॅग आणि खिशातील १२ रुपयेदेखील चोरण्यात आले.

बुधवारी पहाटे एका व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन काश्मिरी गेटजवळ एक तरुण जखमी अवस्थेत पदपथावर झोपल्याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि नरेंद्र कुमारला रुग्णालयात दाखल केले. नरेंद्र कुमारच्या मानेजवळ, पायाला आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे. नरेंद्र कुमारवर सध्या सफदरगंज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नरेंद्रकुमारला धडक देणारा वाहनचालक आणि त्याचा मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला अद्याप अटक करण्यात यश आलेले नाही.