मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झकीउर रहमान लख्वी याची सुटका केल्याबद्दल पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्यास चीनने संयुक्त राष्ट्रसंघात आडकाठी केल्याच्या मुद्दय़ाबाबत, दहशतवादविरोधी यंत्रणेंतर्गत भारताशी चर्चा करण्याची चीनने तयारी दाखवली आहे.
लख्वीच्या सुटकेबद्दल पाकिस्तानवर कारवाई करावी, असा प्रस्ताव भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत ठेवला होता, परंतु भारताने या मुद्दय़ाबाबत पुरेशी माहिती न दिल्याचे सांगून चीनने तो रोखून धरला. या कृतीबद्दल प्रथमच सविस्तर निवेदन करताना चीनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवादाचे बळी ठरलेले दोन्ही देश या संकटाविरुद्ध लढण्यासाठी काम करत आहेत.
लख्वी प्रकरणाशिवाय, हिज्बुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाउद्दीन आणि लष्कर-ए-तोयबाचा नेता हफीझ सईद यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची भारताची मागणीही चीनने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत रोखून धरली होती. लख्वीसंबंधीच्या मुद्दय़ावर आणखी चांगले आकलन होण्यासाठी दोन्ही देशांच्यामंत्र्यांमध्ये दहशतवाद विरोधाबाबत चर्चा होऊ शकते, असे झिलिआन यांनी भारतीय पत्रकारांना बुधवारी सांगितले.