भारतीय वंशाचे परदेशस्थ भारतीय उद्योगपती लक्ष्मी मित्तल आणि माजी कसोटीवीर आणि विद्यमान खासदार मोहम्मद अझरुद्दीन यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुरुवारी येथे सन्मानित करण्यात आले.
‘एशियन व्हॉइस पॉलिटिकल लाइफ अ‍ॅवॉर्डस’चे यंदाचे सातवे वर्ष असून ब्रिटनमधील आशियाई समुदायावर विशेषत: भारतीयांवर ज्यांचा पगडा आहे, अशांना सन्मानित करण्यात येते. ब्रिटिश पार्लमेण्टच्या सभागृहात हा समारंभ पार पडला आणि त्याला ब्रिटनमधील आशियाई समुदायाचे अनेक मान्यवर उपस्थित होते.
ब्रिटनमधील सर्वात धनाढय़ असलेले लक्ष्मी मित्तल यांना ‘चेंजिंग द फेस ऑफ ब्रिटन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मित्तल यांच्या वतीने सुधीर महेश्वरी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मोहम्मद अझरुद्दीन यांना ‘इन्फ्लुअन्स इन इंडियन पॉलिटिक्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतीय क्रिकेटच्या क्षेत्रात आपण दीर्घ खेळी खेळलो असलो तरी राजकीय कारकीर्द केवळ चार वर्षांचीच आहे. हा पुरस्कार आतापर्यंतचा उत्कृष्ट पुरस्कार आहे, असे अझरुद्दीन म्हणाले.
ताज हॉटेल समूहापैकी एक असलेल्या ५१-बकिंगहॅम गेटचे महाव्यवस्थापक प्रभात वर्मा यांना ‘इंटरनॅशनल कोऑपरेशन बिटवीन द यूके अ‍ॅण्ड इंडिया’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डीव्हीके या वित्तीय समूहाचे दीपक कुंतावाला यांना ‘एण्टरप्रेनर ऑफ द इयर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.