‘कलयुगात कालिया नागाने घेतलेला पुनर्जन्म म्‍हणजे नरेंद्र मोदी आहेत. आतापर्यंत ते गुजरातला दंश करत होते. आता संपूर्ण देशाला दंश करायला निघालेत. पण, आम्‍ही असे होऊ देणार नाही. कृष्णाने ज्याप्रमाणे काळ्या नागाचा वध केला होता. त्याप्रमाणे आम्ही मोदींची नथ घालून बिहारमधून पाठवणी करू.,’ अशा तिखट शब्दात लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. लालूंनी नरेंद्र मोदी हे पंतप्रधान बनण्यासाठी पात्र नाहीत असेही म्हटले. जातिनिहाय जनगणनेचे आकडे प्रकाशित करावे, या मागणीसाठी पाटणा येथील गांधीनगर मैदानावर आयोजित उपोषण आंदोलनात ते बोलत होते.
पंतप्रधान मोदींनी शनिवारी पाटणामध्ये झालेल्या सभेत लालूप्रसाद यादवांवर टीका केली होती. लालूप्रसाद व बिहारमधील जंगलराजची तुलना मोदींनी कृष्ण व कालिया नाग यांच्याशी केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना लालूप्रसादांनी मोदींची तुलना कालिया नागाशी केली आहे.