पाटणामधील एका धार्मिक कार्यक्रमात मंचावर कार्यकर्त्यांनी गर्दी उसळल्याने मंच कोसळला. त्यामुळे मंचावर असलेले राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालूप्रसाद यादव जखमी झाले आहेत. त्यांना इंदिरा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पाठिला दुखापत झाल्याचे सांगण्यात आले आहे.

पाटणा येथील दिघा येथे ‘यज्ञ स्थळ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तेजस्विनी यादव आणि आरोग्य मंत्री तेजप्रताप यांच्यासह राज्यसभेच्या खासदार आणि लालूप्रसाद यादव यांची मुलगी मिसा भारती यादेखील उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेल्या मंचावर ते बसलेले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलिसांचाही बंदोबस्त होता. लालूप्रसाद यादव यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते आणि त्यांच्या चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. लालूप्रसाद यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची मंचावर गर्दी झाली होती. गर्दी हटवताना पोलीस कर्मचाऱ्यांचीही दमछाक झाली होती. मंचावर गर्दी वाढल्याने अचानक मंच कोसळला. या घटनेत लालूप्रसाद यादव हे जखमी झाले. त्यांच्या पाठिला दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने इंदिरा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या पाठीला दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या पाठीचा एक्स-रेही काढण्यात आला असून, उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.