जनता परिवाराच्या विलीनीकरणामध्ये अडचणी असतानाच, राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी आता बिहारचे माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांना भाजपविरोधी लढय़ात सामील होण्याचे आमंत्रण दिले आहे. मांझी यांनी हिंदुस्तानी अवाम पक्षाची स्थापना केली आहे. मांझी हे भाजपकडे झुकल्याचे मानले जात असतानाच लालूप्रसादांनी मांझींना एकत्र येण्याचे आवाहन दिले आहे.
भाजपविरोधात व्यापक आघाडीचा भाग म्हणून सर्व पक्षांनी एकत्र यावे असे आवाहन लालूंनी केले आहे. जातीय शक्तींशी लढण्यासाठी व्यापक आघाडी गरजेची असल्याने मांझी यांनी पुढे यावे.
 नितीशकुमार यांच्याशी संघर्ष झाल्यानंतर मांझी संयुक्त जनता दलातून बाहेर पडले. मांझी हे भाजपशी जवळीक दाखवत असल्याने त्यांना आमंत्रण देण्यात अर्थ नाही अशी प्रतिक्रिया जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष वसिष्ठ नारायण सिंग यांनी व्यक्त केली.