बिहारचे आरोग्यमंत्री तेजप्रताप यादव यांनी एका ज्योतिषाने दिलेल्या सल्ल्यामुळे पाटणा येथील सरकारी निवासस्थानाच्या प्रवेशद्वाराची दिशा बदलली आहे. परंतु, प्रश्न इथेच सुटलेला नाही. कारण या प्रवेशद्वार बदलण्याच्या नाट्यामुळे या निवासस्थानामागे गेल्या ५० वर्षांपासून राहत असलेल्या झोपडपट्टीवासियांच्या संकटात वाढ झाली आहे. ‘टेलिग्राफ’ने दिलेल्या वृत्तानुसार राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यांनी ३, देशरत्न मार्ग येथील आपल्या निवासस्थानाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून बंगल्यामागे एक प्रवेशद्वार करून तेथून ते ये जा करत आहेत. २०० मीटरचा हा रस्ता एका झोपडपट्टीतून जातो. विशेष म्हणजे हा बंगला ३ एकर परिसरात विस्तारलेला आहे.

अचलेश या ज्योतिषाने दक्षिण दिशेला असलेले मुख्य प्रवेशद्वार बदलून उत्तरकडून घरात येण्याचा तेजप्रताप यांना सल्ला दिला. वास्तूशास्त्रानुसार दक्षिण दिशेचा दरवाजा हा यमाची दिशा म्हणजे मृत्यूचा दरवाजा असतो तर उत्तर दिशेला कुबेराची दिशा म्हटले जाते, असे अचलेश यांनी सांगितले. परंतु, आरोग्य मंत्री सातत्याने या मार्गावरून येत जात असल्यामुळे येथील लोकांच्या जीवनावर परिणाम झाला आहे. येथील मुलांना आता घराबाहेर खेळता येत नाही, यादव यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दुचाकी लावण्यास प्रतिबंध केला आहे. गेल्या ५० वर्षांपासून येथे २० झोपड्या आहेत.

आम्ही अनेकवर्षांपासून येथे राहतो. पण आरोग्य मंत्री येथे राहायला आल्यानंतर त्यांनी येण्या जाण्यासाठी बंगल्याचा मागचा दरवाजा निवडला आहे. तेव्हापासून आमचे आयुष्य नरकमय झाल्याचे येथील एका व्यक्तीने म्हटले. जेव्हा तेजप्रताप यांचा ८ गाड्यांचा ताफा येथून जाऊ लागतो. तेव्हा येथील लोक दरवाजा बंद करून घरात बसतात. या रस्त्याने राष्ट्रीय जनता दलाचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणावर आपल्या दुचाकींवर येतात. यापूर्वी या मार्गावर पूर्वी कोणीच येत नव्हते, असे तो म्हणाला.