वैष्णोदेवी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ बुधवारी दुपारी दरड कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सीआरपीएफच्या एका जवानाचा मृत्यू झाला असून काही भाविक दरडीखाली अडकल्याची शक्यता आहे. वैष्णोदेवी मंदिराच्या ३ क्रमांकाच्या प्रवेशद्वाराजवळ ही घटना घडली. सध्या वैष्णोदेवी मंदिराच्या परिसरात संततधार पाऊस सुरू असून त्यामुळे दरडीचा मोठा भाग खाली कोसळल्याची शक्यता आहे. यामध्ये सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सीआरपीएफमधील हवालदाराचा मृत्यू झाला आहे, तर तीन भाविक दरडीखाली अडकल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, सध्या सुरक्षेच्या कारणास्तव अमरनाथ यात्रा थांबविण्यात आल्याची माहिती सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.